मच्छिमारांना त्रास न होण्याबद्दल सूचना द्या

पनवेल व उरणच्या आमदारांची पोलीसांना निवेदनाद्वारे मागणी

उरण : उरण विधानसभा मतदारसंघातील करंजा गावातील मासेमारी  करणार्‍या कोळी बांधवांना समुद्रात मासेमारी यांत्रिकी नौकांना त्रास सहन करावा लागत आहे. या होणार्‍या त्रासाबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना या विषयाचे निवेदन दिले.

उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  करंजा गावातील जवळजवळ 500 मासेमारी यांत्रिक नौका असून या मासेमारी यांत्रिक नौका मुंबई येथे मासळी विकत असताना मासेमारी नौका कामानिमित्त करंजा गावात येत असतात. तसेच करंजातून मुंबई येथे समुद्रामार्गे जात असतात. या वेळी मांडवा पोलीस ठाण्याच्या गस्ती नौका मासेमारी नौकांना अडवून त्यांच्याकडून मासळी व पैशाची मागणी करतात. मांडवा पोलीस ठाणे यांच्या अधिकारात असलेल्या कागदपत्रांची तपासणी करावी. या बाबतीत मासेमारी नौका मालकांच्या शिष्टमंडळ येऊन तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर सागरी मांडवा पोलीस ठाण्याशी सबंधित असलेल्या सर्व अधिकारी वर्गाकडून मच्छिमारांना त्रास न होण्याबद्दल सूचना द्याव्यात.

निवेदन देताना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, सागर नाखवा, भानूदास नाखवा, दीपक नाखवा, नारायण नाखवा, रेवस मच्छीमार सोसायटी चेअरमन विश्वास नाखवा आदी उपस्थित होते.