इंधननिर्मितीचा हैदराबाद पॅटर्न नवी मुंबईत

नवी मुंबई : हैदराबादच्या धर्तीवर नवी मुंबईत गोळा होणार्‍या ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून इंधन निर्मित्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सुमारे दीडशे मेट्रीक टन ओल्या कचर्‍यापासून बायोगॅस तयार करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. हा बायोगॅस पालिकेची वाहने आणि एनएमएमटीच्या बसेससाठी वापरला जाणार आहे. यामुळे प्रदुषण कमी होऊन पर्यावरणाचे संतूलन राखण्यास हातभार लागेल. 

स्वच्छते राज्यात पहिला व राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक पटकावेल्या नवी मुंबई महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनामध्येही नावलौकीक प्राप्त केला आहे. आता हैदराबादच्या धर्तीवर नवी मुंबईत इंधननिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. नवी मुंबईत दिवसाला साधारण 700 मेट्रीक टन कचरा गोळा होतो. यात एपीएमसीतील फळ आणि भाजी मार्केटमध्ये सर्वाधिक ओला कचरा गोळा होतो. त्याशिवाय शहरातील हॉटेल्समधूनसुध्दा मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होतो. एकूण निर्माण होणार्‍या घनकचर्‍याचे वर्गीकरण केल्यास जवळपास दीड मेट्रीक टन ओला कचरा तयार होतो. या ओल्या कचर्‍यापासून इंधन निर्मित्ती करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यानुसार लवकरच शहरात दोन सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या दोन्ही परिमंडलांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे दोन बायोगॅस प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. या बायोगॅसचा वापर पालिका स्वत:च्या वाहनांसाठी तसेच एनएमएमटीच्या चारशे वाहनांसाठी करणार आहे. त्यासाठी डिझेलच्या जुन्या इंजिनाचे परिवर्तन गॅस इंजिनमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे पालिका तयार करत असलेल्या गॅसचा जास्तीत जास्त वापर हा पालिकेच्या वाहनांच्या कामी येणार आहे. यामुळे इंधन बचत तर होईलच शिवाय पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल. सीएनजीमुळे वाहनांमुळे होणारे प्रदुषणही कमी होण्यास मदत होईल. 

पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या नेटकनेक्ट फाऊंडेशन या संस्थेने यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी अलिकडेच चर्चा केली. हैद्राबाद येथील बोईपल्ली शहराच्या धर्तीवर वाया जाणार्‍या भाज्यांवर प्रक्रिया करून विद्युत निर्मित्ती करण्याचा प्रस्ताव फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे मांडला. त्या चर्चेनुसार बांगर यांनी टाकाऊ भाजीपाल्यापासून विद्युत निर्मित्ती करण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बी. एन. कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

हैद्राबाद येथील बोईपल्ली या शहरात दिवसाला 10 टन घनकचर्‍यावर प्रक्रिया करून 500 मेगा युनिट विद्युत तर 30 किलो बायोगॅसची निर्मित्ती केली जाते. नवी मुंबईत 150 टन कचर्‍यापासून बायोगॅस तयार केला जाणार आहे.