गिर्यारोहणासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

पनवेल ः गिर्यारोहणासाठी गेलेल्या दोघा मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा सहकारी रस्ता चुकला असल्याने निसर्ग मित्र मंडळ पनवेल व पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला सुखरूप खाली आणले आहे.

तालुक्यातील चंदेरी डोंगरावर गिर्यारोहण करण्यासाठी वैभव कवडे (24 रा.ऐरोली) व त्याचा मित्र सागर भिलारे (24, रा.मुलूंड) हे दोघे गेले असताना मध्य रस्त्यावर या दोघे पुढे मागे झाले. यावेळी सागर भिलारे याने वैभवशी मोबाईलवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो संपर्कात आला नाही. त्यामुळे पुढे गेलेल्या सागर भिलारेने याबाबतची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. तसेच पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.गोपाळ, पोलीस हवालदार रवींद्र म्हात्रे व पथकाने त्वरित निसर्ग मित्र मंडळ पनवेलशी संपर्क साधला व या दोघांचा शोध घेतला असताना सागर भिलारे हा कपारीत अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर त्याचा मित्र वैभव कवडे हा पाय घसरुन खाली पडल्याने गंभीररित्या जखमी अवस्थेत सापडला. त्याला रुग्णालयात आणले असताना तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले आहे. याबाबतची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.