जेएनपीटीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

हरितबंदर उपक्रमांतर्गत प्रकल्पाची उभारणी

उरण ः हरित बंदर उपक्रमांर्तग जेएनपीटीने व्यापक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला आहे. जेएनपीटी टाऊनशिप येथे उभारलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन  जेएनपीटीचे अध्यक्ष  संजय सेठी यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ, व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जेएनपीटीने स्थायी विकासाचे लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने हरित बंदर उपक्रमांतर्गत या प्रकल्पाची उभारणी केली आहे. ह्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन10 मे.टन असून हा प्रकल्प बार्क तंत्रज्ञानावर आधारित आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार ह्या प्रकल्पाची निर्मिति करण्यात आली आहे. त्याचबरोबर बायोगॅसपासून वीजनिर्मिती,बायोगॅस उत्पादन आणि वीजनिर्मिती सेटअपसह प्रति दिवशी 5 मे.टन क्षमतेचा हा प्रकल्प बायोगॅसप्लांट वर आधारित आहे. या प्रकल्पामध्ये सुका कचरा संकलित करण्यासाठी हायड्रॉलिक बिलिंग प्रेस मशीन बसविण्यात आली असून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्यासाठी योग्य पार्टिशन असलेल्या दोन घंटागाड्या आहेत, नागरिकांना जागरूकता प्रशिक्षण देण्यासाठी घनकचरा संकलन उपकरणे सुद्धा आहेत.

बंदराच्या कामकाजाचा पर्यावरण आणि आसपासच्या परिसरावर कमीत-कमी परिणाम व्हावा यासाठी जेएनपीटी सतत स्थायी विकासावर लक्ष केंद्रित करते. पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत जेएनपीटीने विविध हरित उपक्रम हाती घेतले आहेत ज्यामध्ये सौरउर्जा, सांडपाणी पुनर्चक्रण करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ई-आरटीजीसी आणि इकोपार्क, सागरीसंरक्षण आणि व्यापक वृक्षारोपण सारख्या उपक्रमांचा समावेश आहे. बंदर क्षेत्रात उर्जेचा वापर कमी करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी बंदर परिसरात एलईडी दिवे देखील बसविण्यात आले आहे आहेत.