गुंड प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी मी समर्थ

आ. गणेश नाईक यांचे प्रतिपादन

नवी मुंबई : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला धमकावण्याचे प्रयत्न होतील. परंतु कोणत्याही गुंडांना  व दहशतीला रहिवाशांनी घाबरू नका. या गुंड प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी मी समर्थ आहे, असे प्रतिपादन ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी केले. तसेच इंटरनॅशनल डॉन म्हणून जे फिरत आहेत त्यांना देखील गणेश नाईक कोण आहे हे माहित आहे असे सांगून साथ सोडून गेलेल्या नगरसेवकांवर अप्रत्यक्ष टिका केली.  

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुर्भे स्टोअर येथील प्रभाग क्रमांक 68 आणि प्रभाग क्रमांक 70 मधील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना नाईक यांनी निडर राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. या विभागातील प्रतिनिधीला तीन वेळा महापालिकेत स्थायी समितीचे सभापतीपद दिले. परंतु या विभागाचा विकास मात्र झाला नाही. उलट आमचीच साथ सोडून दिली. ज्यांना मी मोठे केले तेच मला अक्कल शिकवायला निघालेत. अशा व्यक्तींचा पुर्ण इतिहास आमच्याकडे आहे. नागरिकांनी गुंडागर्दीला घाबरु नका, काही त्रास झाल्यास मला सांगा मी तुमच्या मदतीला धावून येईन. अशा प्रवृत्तींना जनता त्याची जागा दाखवून देईल, असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. तुर्भे विभागातील सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच याप्रसंगी प्रभाग क्रमांक 68 मधून शितल इंगळे तर प्रभाग क्रमांक 70 मधून राजेश शिंदे यांच्या नावावर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, परिवहन समितीचे माजी सभापती अन्वर शेख, राजेंद्र इंगळे, शिवाजी शिंदे, अंकुश मेढेकर, माजी नगरसेवक मुनावर पटेल, माजी नगरसेवक अमित मेढेकर, अ‍ॅड. गुरू सूर्यवंशी, प्रभू चव्हाण, संतोष हलवाई, झीनत शेख, सुजाता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेवक राजेश शिंदे आणि शीतल राहुल इंगळे यांनी आयोजन केले होते.