नवी मुंबईत तिहेरी लढत

महाविकास आघाडी, भाजपासह 10 राजकीय पक्षांनी कसली कंबर

नवी मुंबई ः महानगरपालिका निवडणूक तोडांवर आल्याने पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात खरी लढत होणार असली तरी आता आणखी 10 पक्षांनी एकत्र येत नवी मुंबई विकास आघाडी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र आहे. 

नवी मुंबईत महानगरपालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता पालट करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीकडून तसेच भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना धुळ चारण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध भाजप असे चित्र नवी मुंबईत आहे. मात्र आता यात आणखी एका आघाडीची भर पडणार आहे. नवी मुंबईत वर्षानुवर्षे काम करणारे पक्ष म्हणजेच रिपब्लिकन सेना, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी लालबावटा, घर हक्क संघर्ष समिती, सोशलिस्ट पार्टी, आरपीआय आर.के.गट जनता दल सेक्युलर, महाराष्ट्र जनशक्ती सेना,सीपीएम या पक्षांनी एकत्र येत नवी मुंबई विकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत या सर्व सेक्युलर पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बेलापूरमधील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यलयात पाड पडली होती. या बैठकीत हा निर्णय घेतला गेला होता. नवी मुंबई विकास आघाडीचे 10 फेब्रुवारी 2021 रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. नवी मुंबई महापलिकेवर सत्ता आणण्यासाठी या तीनही महाविकास आघाडी, भाजप आणि आता नवी मुंबई विकास आघाडीने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.