गुटखा किंग राजन गुप्ता पोलीसांच्या जाळ्यात

शिवसेना पदाधिकारी असल्यानं खळबळ 

नवी मुंबई : गुटखा विक्रीचा हॉटस्पॉट म्हणून एपीएमसी मार्केटची नवीन ओळख निर्माण झाली आहे. अन्न औषध प्रशासन विभागाकडून एपीएमसी भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये 5 पान टपर्‍या सील करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बंदी असणार्‍या विविध प्रकारचा गुटखा सापडला. या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाने 4 जणांना ताब्यात घेऊन एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले. यामध्ये मुख्य सूत्रधार गुटखा किंग राजन गुप्ता उर्फ मुन्ना कित्येक वर्षांपासून गुटख्याचं व्यवसाय करत असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे गुटखा किंग शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने खळबळ उडाली आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस कोठडीत असणारा राजन गुप्ता उर्फ मुन्ना शिवसेना उत्तर भारतीय विभाग बेलापूर विधानसभा उपशहर संघटक पदावर आहे. तसेच एपीएमसी व नवी मुंबई परिसरात शिवसेनेकडून लावण्यात येणार्‍या फलकांवर या गुटखा किंगला मोठ्या रुबाबाचं स्थान देण्यात येते. त्यामुळे शिवसेनेच्या आशीर्वादानेच ही गुटखा विक्री होते आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उप्तन्न बाजार समितीमध्ये पाचही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जाते. मार्केटमध्ये जवळपास 20 गोणी गुटखा दिवसाला विकला जात असल्याचा अंदाज आहे. मार्केटमध्ये बाजारसमिती विकास शाखेकडून वाटप करण्यात आलेल्या पान टपर्‍यांवर सर्रास गुटखा विकला जात आहे. एपीएमसी पोलीस व अन्न औषधी प्रशासन विभागाकडून वारंवार एपीएमसी प्रशासनाला पत्र देउन सुद्धा त्यावर कारवाई केली जात नव्हती. ठाकरे सरकारने गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतल्याने गेल्या काही दिवसात एपीएमसी पोलीस व अन्न औषधे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईत पाचही मार्केटमध्ये काही टपर्‍यांवर गुटखा विक्री होत असल्याचे आढळून आले होते. याबाबत लेखी तक्रार संबंधित अधिकार्‍यांनी बाजार समितीला दिली होती. यावेळी गुटखा विक्री करणार्‍या टपर्‍यांना सील करण्यात आले होते. परंतू बाजार समिती प्रशासनाने पुन्हा या टपर्‍या उघडण्याची परवानगी दिली. त्यामुळे या पान टपर्‍यांवर उघडपणे पाणी आणि बिस्कीट विकण्याच्या नावाखाली खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत दीड कोटी रकमेचा गुटखा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आला होता. मागील 3 महिन्यात अमली आणि नशेली पदार्थ विक्री आणि साठा प्रकरणी 38 कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यातील 30 कारवाया गुटखा वाहतूक, विक्री आणि साठ्याप्रकरणी करण्यात आल्यात. या प्रकरणात 65 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखा अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. शेखर पाटील यांनी दिली. नुकतेच गुटखा विक्री प्रकरणी फळ आणि भाजीपाला मार्केट मिळून 6 गाळे सील करण्यात आले आहेत. मुख्य सूत्रधार अटकेत असताना देखील संपूर्ण मार्केटमध्ये गुटखा विक्री मात्र जोरात सुरु असल्याने गुटखा विक्री बाजारसमितीच्या आशीर्वादाने तर चालू नाहीना अशी जोरदार चर्चा सुरु आहे.  फ्रुट मार्केट 38, भाजीपाला मार्केट 30, धान्य मार्केट 22, कांदा बटाटा मार्केट 10 आणि मसाला मार्केट 23 अशा एकूण 123 पान टपर्‍यांचे वाटप बाजार समितीने केले आहे. यातील जवळपास 100 पान टपर्‍यांमध्ये गुटखा विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या प्रकरणी एपीएमसी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.