अपहरण करुन तरुणाची हत्या

प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचे उघड 

नवी मुंबई ः काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह घणसोली येथे आढळून आला आहे. अपहरण करून त्याची हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे. मारेकर्‍यांनी घणसोली येथील फोर्टी प्लस मैदान लगत त्याचा मृतदेह टाकला होता. 

अनिल शिंदे (20) तळवली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो बेपत्ता असल्याची तक्रार रबाळे पोलिसांकडे प्राप्त झाली होती. याप्रकरणी पोलीस तपास करत असताना काही जणांवर पोलिसांना संशय आला होता. त्यामुळे पोलिसांनी शेवटच्या क्षणी अनिलच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला. त्यामध्ये काहींची माहिती समोर आली होती. त्यांचा अनिल सोबत वाद झाला होता, यामुळे सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अनिलची हत्या केल्याची कबुली दिली. शिवाय त्यांनी मृतदेह घणसोली येथील फोर्टी प्लस मैदानालगत टाकल्याचीही कबुली दिली. त्यानुसार सोमवारी रात्री पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता मृतदेह आढळून आला. तसेच प्रेम प्रकरणातून त्याची हत्या झाली असल्याचेही उघड झाले. याप्रकरणी रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत.