तेल तस्करी करणारे त्रिकुट गजाआड

12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; पनवेल गुन्हे शाखा-2 ची कारवाई

उरण ः तालुक्यातील पाणजे येथील खाडीत तेल तस्करी करणार्‍या तिघांना पनवेल गुन्हे शाखा-2 च्या पथकाने गजाआड केले आहे. खाडीमध्ये धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तेल तस्करीसाठी वापरलेली बोट, 3 हजार लिटर मीटर स्पिरीट, हायस्पीड असा एकूण 12 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अखिलेश वसंत रावकुमार, लक्ष्मण पप्पू वाल्मिकी उर्फ चेटा आणि दिनेश अर्जुन गायकवाड उर्फ कड्या अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्यावर मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उरण तालुक्याला मोठा सागरी किनारा लाभला आहे. तर जेएनपीटी बंदरासारखे जागतिक स्तरावरचे बंदरही याच हद्दीमध्ये आहे. यामुळे येथील सागरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जहाजांची वर्दळ सुरु असते. याचाच गैरफायदा घेत येथील सागर किनार्‍यावर तेल तस्कर सक्रीय झाले आहेत. या तेल तस्करांच्या माध्यमातून समुद्रामध्ये उभ्या असणार्‍या जहाजांमधून तेल काढून त्याची तस्करी करण्यात येते. सदरची तस्करी उरणच्या किनार्‍यावरुन होत असून, येथील तस्करांचा शोध अनेक वर्षे सुरू आहे. 

रविवारी (7 फेब्रुवारी) मध्यरात्री पनवेल गुन्हे शाखा-2 च्या पथकाने उरणच्या पाणजे खाडीमध्ये धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत तेल तस्करीसाठी वापरात आलेली बोट, तीन हजार लिटर मोटर स्पिरीट तसेच हायस्पीड डिझेल असा एकूण 12 लाख 40 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.