पूर्व स्वच्छ सर्वेक्षणाला सुरूवात

विभागनिहाय नियुक्त नोडल अधिकार्‍यांकडून परीक्षण

नवी मुंबई ः स्वच्छ भारत मिशनच्या केंद्रीय पथकामार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाण्यापूर्वी सर्वेक्षणाच्या माहिती पुस्तिकेस (टूल कीट) अनुसरून स्वच्छतेच्या निकषांची तपासणी नोडल अधिकारी यांच्याकडून करून घेण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारपासून विभागीय नोडल अधिकारी यांचेमार्फत प्रभागनिहाय पूर्व स्वच्छ सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आलेली आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे प्रत्येक विभागासाठी नेमलेल्या नोडल अधिका-यांचे यापूर्वीचे विभाग हे  स्वच्छ सर्वेक्षण करण्याकरिता बदलण्यात आले आहेत, जेणेकरून अधिक बारकाईने परीक्षण होईल.

9 तारखेपासून 13 फेब्रुवारीपर्यंत विभागीय नोडल अधिकारी यांचेमार्फत हे परीक्षण केले जाणार असून त्यांनी परीक्षणासाठी नेमून दिलेल्या विभागांतर्गत असलेल्या प्रभागातील स्वच्छता कामांची तपासणी सूचीनुसार (चेक लिस्ट) पाहणी करावयाची आहे व मूल्यांकन अहवाल तयार करून महापालिका आयुक्त यांना सादर करावयाचा आहे. त्याचप्रमाणे तपासणी दरम्यान नोडल अधिकारी यांना आढळून येणार्‍या त्रुटी संबंधितांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांची 13 फेब्रुवारीपूर्वी पूर्तता करून घेण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. याशिवाय दोन्ही अतिरिक्त आयुक्त यांनी नोडल अधिकारी यांनी मूल्यांकन केलेल्या प्रभागातील कामांची नमुना दाखल फेरतपासणी करावी असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.

कचरामुक्त  शहरांचे फाईव्ह स्टार रेटींग लाभलेल्या देशातील सहा शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर असून यावर्षी सेव्हन स्टार रेटींग प्राप्त करण्याकरिता प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे हागणदारीमुक्त शहराचे ओडीएफ डबल प्लस मानांकन प्राप्त असलेल्या नवी मुंबई शहराचे मानांकन यावेळी अधिक उंचावत वॉटर प्लस मानांकन प्राप्त करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. त्यादृष्टीने नोडल अधिकारी यांच्यामार्फत होत असलेले हे पूर्व स्वच्छ सर्वेक्षण ही प्रत्यक्ष सर्वेक्षणाची रंगीत तालीम असून ती तितक्याच काटेकोरपणे केली जाणार असल्याने सर्व विभाग दक्ष झालेले आहेत.