अखेर आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळे तोडले

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नियम पाळून खासगी विवाह हॉल, समाजमंदिर सुरू झालेले असतानाही नेरूळमधील सिडकोचे आगरी-कोळी सांस्कृतिक भवन मात्र बंदच आहे. हे भवन सुरु करण्यासाठी सिडको व राज्य सरकारला वारंवार मागणी व पाठपुरावा करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने दिलेल्या इशार्‍यानुसार सारसोळे गावच्या मनोज मेहेर यांनी संतप्त होवून गुरूवारी सकाळी आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळेच तोडले. 

 नवी मुंबई कार्यक्षेत्रात सर्व व्यवहार आता समाजमंदिर, हॉलमध्ये केले जात आहे. वाढदिवस, विवाह, साखरपुडे खासगी हॉलमध्ये सुरू आहेत. खासगी हॉल सुरू असतानाही नेरूळ सेक्टर 24 मधील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन मात्र बंद आहे. हे सांस्कृतिक भवन बंद असतानाही स्थानिक आगरी-कोळी समाजाला विवाह व अन्य कार्यक्रमासाठी खासगी हॉल भरमसाठ भाडे देवून घ्यावे लागत आहे. यामध्ये ग्रामस्थांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यावर आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सुरू करण्यात यावे यासाठी सारसोळे गावच्या मनोज मेहेर यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यत सर्वाकडे लेखी पाठपुरावा करत समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. तथापि या पाठपुराव्याकडेही कानाडोळा होत असल्याचे पाहून 10 फेब्रुवारीपर्यत आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सुरू न केल्यास 11 फेब्रुवारीला आगरी-कोळी भवनचे टाळे तोडणार असल्याचा इशारा मनोज मेहेर यांनी सिडकोसह राज्य सरकारला दिला होता.

गुरूवारी सकाळी मनोज मेहेर यांनी आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळे तोडले. आतमध्ये जावून त्यांनी भवनची पाहणी केली. या भवनात लवकरात लवकर ग्रामस्थांचे विवाह सुरू करण्याची मागणी यावेळी मनोज मेहेर यांनी यावेळी केली. कोणा आगरी-कोळी समाजबांधवांना येथे विवाह करावयाचा असल्यास त्यांनी आपल्याला संपर्क करावा, आपण स्वखर्चाने आगरी-कोळी सांस्कृतिक भवनची सफाई करून देवू असे मनोज मेहेर यांनी यावेळी सांगितले.