दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे निवेदन

पनवेल : अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष विलास फडके, जिल्हा उपाध्यक्ष बाळाराम गणू रोडपालकर तसेच संस्था पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने 5 फेब्रुवारी रोजी महानगर पालिकेच्या कार्यालयात सहाय्यक आयुक्त गुलवे यांच्याकडे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील द्विव्यांगांच्या विविध समस्या व अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांच्या समस्या, अडतचणींचे तसेच मागण्यांचे निवेदन सादर केले. यावर सकारात्मक चर्चा झाली असून सर्व मागण्या महानगरपालिका आयुक्तांच्या समोर ठेवण्याचे आश्वासन गुलवे यांनी दिले. 

महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व दिव्यांग व्यावसायिकांच्या टपर्‍यांना कायमस्वरूपी व्यवसाय परवाने त्वरित देण्यात यावेत. हे सर्व दिव्यांग व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. त्यांना व्यवसायाकरिता भांडवल पुरविण्यासाठी सुलभ, सक्षम व अभ्यासपूर्ण  कर्ज योजना तयार करावी. दिव्यांगत्वाचे प्रमाण जास्त असणार्‍या दिव्यांगांना कुष्ठरुग्णांच्या धर्तीवर पेन्शन योजना सुरू करावी. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व दिव्यांगांचे परिपूर्ण सर्वेक्षण करावे. दिव्यांग जनांनाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय व जिल्हा परिषद यांच्या योजनांचा अभ्यास करून अनेक नवीन योजना महानगर पालिका सुरू करू शकेल. उदा.1) दिव्यांग विवाह प्रोत्साहन आर्थिक निधी योजना 2)दिव्यांग व सुदृढ व्यक्ती विवाह प्रोत्साहन बक्षीस योजना 3)अंतर जातीय विवाह प्रोत्साहन योजना, दिव्यांग खेळाडूंना सर्व सोईनी सुसज्ज असे मैदान राखून ठेवणे. दिव्यांग व्यक्तीला उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट मिळावी. फक्त कायमस्वरूपी नोकरीत असणारा दिव्यांग व स्वतः उत्पन्नाच्या बाबतीत सक्षम असणारा दिव्यांग यांनाच दिव्यांग योजना लाभातून वगळावे, ज्या दिव्यांगांना दरमहा कायमस्वरूपी वैद्यकीय खर्च येत असेल तर अशा दिव्यांगांना पालिकेमार्फत मदत करावी  अशा प्रकारे विविध मागण्यांचे सादरीकरण करण्यात आले. या चर्चेत महानगर पालिकेच्या गुलवे, संजय देशमुख व अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.