‘मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक’

‘एक पाऊल अपघातमुक्त समाजाकडे’ परिसंवादात सल्ला

नवी मुंबई ः शासनाच्या 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नवी मुंबई पोलीस वाहतूक विभाग आणि नवी मुंबई प्रेस क्लब यांच्यावतीने नागरिकांशी सुसंवाद साधणारा एक पाऊल.. अपघातमुक्त समाजाकडे हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात उपस्थित सर्व मान्यवरांनी अपघात टाळण्यासाठी मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक असल्याचा संदेश उपस्थित नागरिकांना दिला. 

राज्यात 18 जानेवारीपासून 17 फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. विविध माध्यमातून लोकांचे प्रबोधन करुन अपघात कसे टाळता येतील त्याबाबत हे अभियान राबविण्यात सुरु आहे. वाशीतील विष्णुदास भावे सभागृहात समाजातील अनेक तज्ज्ञ व्यक्तींना  भविष्यातील अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात आणि कोणती दक्षता घ्यावी याबाबत  मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले होते.  

या परिसंवादात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, सुप्रसिद्ध परिवहन नियोजनकार व तज्ज्ञ अमोल खैर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभदा नायक व मानसोपचारतज्ज्ञ विकास देशमुख यांनी भाग घेतला. 

प्राचार्या शुभदा देशमुख यांनी मुलांच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमात रस्ते नियमांचा आंर्तभाव करावा तसेच प्रत्येक नागरिकाला प्रथमोपचार करण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे अपघात झालेल्या व्यक्तिस जागेवरच प्रथमोपचार मिळाले तर त्याचा जीव वाचविणे शक्य होईल. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विलास देशमुख यांनी अतिवेगाने वाहन चालविणे, मोबाईचा वापर, राग आणि मद्य पिऊन वाहन चालविणे यामुळे अपघात होत असल्याचे सांगितले. कायदे कडक करुन त्याची अमंलबजावणी करणे त्याचबरोबर पत्रकारांनीही सकारात्मक बातम्या देऊन  कायद्याचा धाक वाचकाच्या मनात निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. परिवहन नियोजनकार यांनी यावेळी 10 ते 12 टक्के अपघात हे चुकीचे नियोजन केल्याने होत असल्याचे सांगून त्यातील 50 टक्के अपघात हे जंक्शनवर होत असल्याचे सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आवश्यक तेथे भुयारी मार्ग बनवून तसेच पोलीसांनी आणि हायवे अभियंत्यांनी हातात हात घालून काम केले तर बराचसा फरक पडेल असे सूचविले. 

पालिका आयुक्त बांगर यांनी प्रत्येक माणसाने संयम हा आपल्या जीवनपद्धतीचा भाग बनवून वैयक्तित स्तरावर स्वतः मध्ये बदल करण्याच्या सूचना केल्या तर पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी सर्वांनीच नियमाचे पालन केल्यास अपघातांवर नियंत्रण आणणे शक्य असल्याचे सांगितले. नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष जालनावाला यांनी हा सुसंवाद घडवून आणला म्हणून उपस्थित मान्यवरांनी नवी मुंबई प्रेस क्लबला धन्यवाद दिले.