19 भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत 677 कोटींची भर

नवी मुंबई ः सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रियेद्वारे खारघर, सानपाडा, कळंबोली व उलवे येथील एकूण 20 निवासी तथा वाणिज्यिक भूखंडांच्या भाडेपट्ट्यावर विक्री योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून सदर भूखंडांना विक्रमी दर प्राप्त झाला आहे. यामधील सानपाड्यातील सेक्टर 18 मधील 2 भूखंडांना प्रत्येकी रू. 2,21,468 व रू. 2,62,548 असे विक्रमी भाव प्राप्त झाले आहेत. या भूखंडांचे आधारभूत दर अनुक्रमे रू. 77,468 व रू. 95,074 असे होते. या भूखंडांसोबतच इतर 17 भूखंडाच्या विक्रीतून सिडकोला अंदाजे रू. 677 कोटीचा महसूल प्राप्त झाला आहे. 

योजना पुस्तिकेतील वेळापत्रकानुसार संपूर्ण प्रक्रिया पार पडून 12 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाईन माध्यमातून ई-निविदा उघडण्यात आल्या व ई-लिलाव प्रक्रियेमधील बोलींची तुलना करण्यात येऊन यशस्वी निविदादारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सदर योजनांतर्गत सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 27 येथे एकूण 9 भूखंड, कळंबोली सेक्टर 17 येथे 4 भूखंड, सानपाडा सेक्टर 8 मध्ये 3 तर सेक्टर 18 मध्ये 2 भूखंड व उलवे येथे सेक्टर 19 मध्ये 1 भूखंड असे एकूण 19 भूखंड भाडेपट्ट्यावर विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. सदर भूखंड हे निवासी/वाणिज्यिक वापराकरिता उपलब्ध होते. ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत अर्ज नोंदणी, अनामत रकमेचा भरणा, निविदा भरणे या सर्व प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व जलद अशा ऑनलाईन पद्धतीने  राबविण्यात आल्या. यामध्ये ऑनलाईन माध्यमातून बंद निविदा सादर केल्यानंतर अर्जदरांना पुढील टप्प्यातील ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार होते. बंद निविदेमध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली किंवा ई-लिलावामध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली यांपैकी जी बोली जास्त रकमेची असेल ती बोली स्वीकारण्याचा निकष निश्चित करण्यात आला होता.

सिडकोतर्फे सादर करण्यात येत असलेल्या या योजनांना अभूतपूर्व मिळणारा प्रतिसाद हा सिडकोवर असणार्‍या सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतिक आहे, असे मत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.