वाढीव चटई निर्देशंकाने लोकसंख्या वाढत नाही

परिसंवादात माजी सह संचालक नगररचना प्रकाश भुक्ते यांचा जावईशोध

नवी मुंबई ः महाराष्ट्र सरकारने राज्यात लागू केलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूदींबाबत स्पष्टता यावी म्हणून क्रेडाई एमसीएचआय रायगड यांच्यामार्फत वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांनी केलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना माजी सहसंचालक नगररचना प्रकाश भुक्ते यांनी चटईक्षेत्र वाढल्याने लोकसंख्या वाढत नाही त्यामुळे त्याचा विकास आराखड्यावर कोणताही परिणाम होत नाही असे सांगितल्याने उपस्थितांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

राज्य सरकारने 2 डिसेंबर 2020 पासून राज्यासाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू केली आहे. नव्याने लागू केलेल्या या नियमावलीमुळे व त्यातील नवीन तरतूदींमुळे विकसक, वास्तुविशारद व नगररचना अधिकारी यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. हा संभ्रम दूर व्हावा म्हणून राज्यभर शासनाने नगररचना अधिकारी, वास्तुविशारद व विकासक यांच्यासोबत शासनाच्या अधिकार्‍यांचे परिसंवाद आयोजित करण्याचे सत्र अवलंबले आहे. 

बुधवारी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रांत राज्याचे नगररचना संचालक नानगुरे, सचिव अविनाश पाटील, सह-संचालक भोपळे तसेच ज्यांनी ही नियमावली बनवण्यास मोलाची कामगिरी बजावली त्या माजी सह-संचालक प्रकाश भुक्ते यांच्या उपस्थितीत हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रकाश भुक्ते यांनी सादरीकरणाद्वारे नियमावलीतील अनेक तरतूंदीबाबत उपस्थितांच्या प्रश्‍नांचे निरसन केले. यावेळी उपस्थितांनी विकास नियंत्रण नियमावलीमुळे नवीन बांधकामांना तसेच पुनर्विकासाला 4.8 ते 5.8 चटईक्षेत्र रस्त्याच्या रुंदीप्रमाणात मिळणार असल्याचे भुक्ते यांना सांगून त्याचा नवी मुंबईच्या विकास आराखड्यावर काय परिणाम होईल याबाबत प्रश्‍न विचारले. त्याचबरोबर  नव्याने वाढणार्‍या लोकसंख्येच्या प्रमाणात सार्वजनिक सेवा, सुविधा, खेळाची मैदाने, उद्याने व मोकळ्या जागांची तरतूद कशी करणार? हा प्रश्‍न विचारल्यावर चटई निर्देशांक वाढल्याने लोकसंख्या वाढत नाही असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. त्यांच्या या खुलाशावर अनेक वास्तुविशारदांनी आश्‍चर्य व्यक्त केले असून त्यांनी विकसीत केलेल्या नवीन विकास नियंत्रण नियमावलीच्या अंमलबजावणीबाबत खाजगीत शंका  उपस्थित केली. या नियमावलीच्या अंमलबजावणीपुर्वी त्याचा विद्यमान  लोकांच्या राहणीमानावर,  सामाजिक सेवा सुविधांवर व पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी बनवलेली एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली ही एकांगी असल्याचे सुचित होत असून विचार केला नसल्याचे जाणवत आहे. त्यामुळे या नवीन विकास नियंत्रण नियमावलीमुळे शहराचा विकास होणार की आहे ती शहरे भकास करणार याबाबत दबक्या आवाजात चर्चा उपस्थितांमध्ये होती. 

दृकश्राव्याद्वारे या संवादाला संबोधित करताना ही नियमावली बांधकाम क्षेत्राला ऊर्जा देणारी ठरणार असून त्यामूळे घरांची संख्या वाढल्याने परवडणार्‍या घरांची निर्मिती होणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर अनेकवर्ष रखडलेले झोपडपट्टी तसेच धोकादायक इमारतींच्या बांधकामांचा प्रश्‍न या नियमावलीमुळे मार्गी लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.