भयंकर स्फोटाने विमानतळ परिसर हादरला

नवी मुंबई ः मंगळवारी नवी मुंबई विमानतळ परिसरात टेकडी सपाटीकरण करण्याच्या कामात संबंधित ठेकेदाराने केलेल्या भयंकर स्फोटामुळे स्थानिक परिसर हादरला.    भुकंप झाल्याचे समजून रहिवाशांनी  घराबाहेर घाव घेतली परंतु त्यांना हे धक्के ब्लास्टिंगमुळे झाल्याचे समजले. पोलीसांनीही संबंधित ठिकाणी धाव घेऊन प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली परंतु अद्यापपर्यंत ठेकेदारावर कोणतीही कारवाई न केल्याने प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

नवी मुंबई विमानतळ परिसरात उलवे टेकडी सपाटीकरण तसेच गाढी आणि उलवे नदीचे पात्र बदलण्याची कामे सिडकोने मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहेत. 2019 मध्ये नवी मुंबई विमानतळावरुन पहिले विमान उडेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. यामधील उलवे टेकडी सपाटीकरणाचे काम दिलेल्या मुदतीत पुर्ण झाले नसून अद्यापपर्यंत 40 टक्के काम अपुर्ण असल्याने मागील महिन्यात मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत ते  तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला महाराष्ट्र शासनाने दिल्या आहेत. त्याचबरोबर गाढी नदीचे पात्र बदलण्याचे कामही संत गतीने सुरु असल्याने वाढीव मुदतीत तेही पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित ठेकेदारांनी सपाटीकरणाचे काम लवकर व्हावे म्हणून सूमारे 500 मीटरच्या डोंगराच्या कड्यावर 600 होल बोरिंग मशीनच्या सहाय्याने मारुन ते टप्प्याटप्प्याने एकाच वेळी उडवले. यावेळी झालेल्या भयंकर स्फोटाने तेथील स्थानिकांना त्यांच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. या स्फोटाची तिव्रता एवढी मोठी होती की त्याचा धक्का 2 किलोमीटर परिघातील रहिवाशांना जाणवला. लोकांनी तातडीने घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी धाव घेतली. परंतु काही वेळानंतर हे धक्के विमानतळ परिसरात  सुरु असलेल्या दगड उत्खननातील स्फोटांमुळे बसले असल्याचे समजताच त्यांनी मोठा संताप व्यक्त केला. 

घटनेच्या ठिकाणी पोलीसांनीही धाव घेऊन कोणता अपघात घडला का याची पडताळणी केली. परंतु ठेकेदारानेच हे भयंकर स्फोट घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यावरही कोणतीही कारवाई संबंधितांवर केली नाही. संबंधित ठेकेदार हा एका आमदाराच्या जवळचा असल्याचा आरोप स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी करुन पोलीस व सिडको ठेकेदाराला पाठिशी घालत असल्याचे सांगितले. या कामात संबंधित आमदाराची भागिदारी असल्याचाही गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. याबाबत सिडकोच्या संबंधित अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता त्यांनी संबंधित ठेकेदाराला समज देऊन नियमानुसार व आजूबाजूच्या परिसराला त्रास होणार नाही याची काळजी ब्लास्टिंग करताना घेण्याच्या सूचना केल्याचे सांगितले. दरम्यान, पोलीसांनी याबाबत काय कारवाई केली याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. 

संबंधित ठेकेदाराने कशापद्धतीने डोंगर सपाटीच्या कामात विस्फोट करावा आणि त्याचे परिमाण मोजण्याची यंत्रे ठिकठिकाणी लावलेली आहेत. ठेकेदाराने एकावेळी किती स्फोट घडवून आणावा याचे परिमाणही घालून दिलेले आहे. अशाप्रकारचा मोठा स्फोट झाल्याचा आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा अहवाल नाही. जर ठेकेदाराकडून कामात हलगर्जीपणा होत असेल आणि त्याचा त्रास सभोवताली राहणार्‍या रहिवाशांना होत असेल तर योग्यप्रकारच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात येतील. 
- एस. एस. गोसावी, कार्यकारी अभियंता सिडको