वाहने भाड्याने घेऊन अपहार करणारा जेरबंद

नवी मुंबई ः वाहने भाड्याने घेऊन सुरुवातीला नियमित भाडे देऊन वाहन मालकाचा विश्‍वास संपादन करुन काही महिन्यांनी त्या वाहनाचा अपहार करणार्‍या आरोपीला एपीएमसी पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून अपहार केलेल्या 37,00,000 किमंतीच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. 

शेल्डन वाझ असे आरोपीचे नाव आहे. कोपरखैरण येथे राहणार्‍या शिशिर मेनन यांच्या मालकीचे वाहन भाड्याने घेऊन दोन महिने भाड्याचे पैसे देऊन नंतर त्या वाहनाचा अपहार केल्याप्रकरणी मेनन यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासामध्ये सदर आरोपी मार्केट एपीएमसी येथे येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत पोलीसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा लावून आरोपी शेल्डन वाझ याला शिताफीने अटक केली. त्याची चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. 

गुन्ह्यातील अपहार केलेली कार तसेच अतरकाही लोकांना अशा प्रकारची बतावणी करुन चार चाकी व मोटार सायकल यांचा अपहार केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून 2 गुन्हे उघडकीस आणले असून अपहार केलेली 37,00,000 रुपये किंमतीची 5 वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत.