सहायक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

पोलीस ठाण्यात झाडली स्वतःवर गोळी 

नवी मुंबई : सहायक पोलीस निरीक्षकाने स्वतःच्या शासकीय पिस्तूलमधून छातीत गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी एपीएमसी पोलीस ठाण्यात घडली. भूषण पवार असे आत्महत्या केलेल्या सहायक निरीक्षकाचे नाव आहे. 

काही दिवसांपासून ते वैद्यकीय सुट्टीवर गेले होते. परंतु रविवारी सकाळी ते पोलीस ठाण्यात आले असता, 17 तारखेपासून कामावर रुजू होणार असल्याचे उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सांगत होते. यानंतर ते अधिकार्‍यांसाठी असलेल्या खोलीत गेले. त्यांनी दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर काही वेळातच आतून गोळी सुटल्याचा आवाज आल्याने पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी दरवाजा उघडला असता आतमध्ये पवार हे रक्तबंबाळ अवस्थेत आढळले. त्यांच्या छातीत गोळी लागलेली होती. यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पवार हे शिस्तप्रिय व शांत अधिकारी म्हणून परिचित होते. पवार यांना 2007 मध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतश्री मिळालेला होता. वर्षभरापूर्वी त्यांची तपास विभागातून जनरल विभागात बदली करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांपासून ते मानसिक तणावात होते. त्यांच्या तणावाचे व आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.