मालमत्ता कर अभय योजनेला मुदतवाढ

अंतिम तारिख 1 मार्च 2021 

नवी मुंबई ः कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळावा यादृष्टीने 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत मालमत्ता कर अभय योजना जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची मुदत वाढविणेबाबत विविध माध्यमातून करण्यात आलेल्या विनंतीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर अभय योजनेस 01 मार्च 2021 पर्यंत अंतिम मुदतवाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे.

मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असून 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% पर्यंत सूट देणारी थकबाकीदारांसाठी लाभदायी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. या अभय योजनेअंतर्गत 15 फेब्रुवारी पर्यंत 97 कोटी 88 लक्ष इतकी रक्कम प्रत्यक्ष जमा झालेली असून अभय योजनेचा लाभ घेताना नागरिकांना 52 कोटी 30 लक्ष रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेची सूट मिळालेली आहे. या 2 महिन्यांच्या अभय योजनेस अजून थोडा कालावधी वाढवून मिळावा अशा प्रकारच्या विनंती / सूचना केल्या जात होत्या. त्यास अनुसरून ही 15 अधिक दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

आता 1 मार्च 2021 पर्यंत थकबाकीदार नागरिकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक 25% दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांच्या दंडात्मक रक्कमेवर 75% सूट मिळणार आहे. तरी नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन 1 मार्चपर्यंत न थांबता पालिकेच्या वेबसाईटला भेट देऊन अभय योजनेचा लाभ घ्यावा व शहर विकासास हातभार लावावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.