ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे 35 टक्के काम पुर्ण

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली प्रकल्पाची पाहणी ; कामाचे कौतुक

मुंबई : मुंबई ते नवी मुंबईला जोडणार्‍या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाचे 35 टक्के काम पुर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी या प्रकल्पाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी महामारीच्या काळातही हाती घेतलेल्या या कामाचे कौतुक केले. 2023 च्या मध्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज एमएमआरडीएने व्यक्त केला आहे. 

मुंबई व नवी मुंबई यामधील वाहतूक वेगवान व्हावी या हेतूने मुंबई बेटावरील शिवडी ते मुख्य भूमी (नवी मुंबई) वरील न्हावा यादरम्यान पूल बांधण्याचा विचार 30 वर्षांपुर्वीच करण्यात आला होता. त्याला आता मुर्त स्वरुप मिळत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पांचे काम आहे. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी साडेचार वर्षे आहे. प्रकल्पात शिवडी, मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणार्‍या 22 कि.मी. लांबीच्या 6 पदरी पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी 16.5 कि.मी. तर, जमिनीवरील लांबी 5.5 कि.मी. आहे. या प्रकल्पाच्या पाइल, पाइल कॅप, पुलाच्या खांबाचे बांधकाम सुरू आहे. पुलाचे सेगमेंट बनविण्याचे काम कास्टिंग यार्डमध्ये सुरू केले. पुलाच्या गाळ्याचे सेगमेंट उभारणीचे काम अणि तात्पुरत्या पूल बांधकाम प्रगतिपथावर आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महानगर आयुक्त आर. राजीव व एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या कामाचे कौतुक केले. सप्टेंबर 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज होता मात्र, साथीच्या रोगामुळे या प्रकल्पाला विलंब झाला. 2023 च्या मध्यापर्यंत हे काम पुर्ण होईल असा अंदाज एमएमआरडीएने व्यक्त केला. 

समुद्रातील दुव्यावरील पुलाच्या एकुण कामापैकी 35 टक्के काम पुर्ण झाले आहे. पुलाला शिवडी व नवी मुंबईतील शिवाजीनगर, राज्य मार्ग - 54 व राष्ट्रीय महामार्ग 4 ब व चिले गावाजवळ आंतरबदल आहेत. संपूर्ण कॉरिडॉरला तीन पॅकेजेसमध्ये विभागले गेले असून या प्रकल्पाला जपानी आंतरराष्ट्रीय सहकार संस्था (जेआयसीए) द्वारे अर्थसहाय्य दिले जात आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतुक कोंडी फुटणार असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर अंदाजे 70,000 वाहने दररोज या पुलावरून मार्गक्रमण करणार आहेत. तसेच प्रवासाची वेळ दोन तास कमी होऊन मुंबई ते नवी मुंबई प्रवास केवळ अर्ध्या तासात होणार आहे.