रायगड जिल्ह्यासाठी 275 कोटींचा आराखडा मंजूर

अलिबाग ः रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी वर्षांसाठी 275 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. ग्रामीण रस्ते, शाळा, अंगणवाड्या दुरुस्तीच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासाठीचा हा विक्रमी विकास आराखडा असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या मर्यादेनुसार पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या जिल्हा नियोजन समितीने सन 2021-22 साठी 189 कोटी 64 लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर करुन शासनाकडे पाठवला होता. याखेरीज सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी अतिरिक्त 88 कोटी 65 लाख रूपयांची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारने रायगडकरांसाठी 270 कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. मागणीपेक्षा तब्बल 91 कोटी रुपयांचा जादाचा निधी रायगडकरांना मिळणार आहे. कोरोना आणि चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर हा जादाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील रस्ते, नादुरुस्त शाळा, अंगणवाड्यांच्या उभारणीसाठी हा निधी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होताना दिसतील, अशी अपेक्षा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नुकताच कोकण विभागाच्या जिल्हा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी रायगडसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांच्या प्रारुप आराखड्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला कोकणातील जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते.

2021-22 साठी जिल्हा नियोजन आराखड्यातील निधी :
ठाणे जिल्हा -  450 कोटी.
मुंबई उपनगर - 440 कोटी.
रायगड जिल्हा - 275 कोटी.
रत्नागिरी जिल्हा - 250 कोटी.
सिंधुदुर्ग जिल्हा - 170 कोटी.
पालघर जिल्हा - 175 कोटी.
मुंबई शहर    - 180 कोटी.