भाजपा पदाधिकार्‍यांचा सिडको अधिकार्‍यांना घेराव

खारघर ः मागील अनेक दिवसांपासून खारघर परिसरात पाण्याची समस्या भेडसावत आहे. याविषयी अनेकदा तक्रारी करुनही सिडको प्रशासनाने ठोस अशी कार्यवाही केली नाही. त्यामुळे खारघरचे नगरसेवक, भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांना घेराव घालून पाण्याचे समस्येबद्दल जाब विचारला. तसेच सदर समस्या लवकरात लवकर न सुटल्यास मोठ्या स्वरूपाचा मोर्चा सिडकोवर आणू, असा इशारा दिला.

गेल्या काही दिवसांपासून खारघर सेक्टर 13,14,19,20 आणि 21 मध्ये पाण्याची समस्या गंभीर झालेली असून परिसरातील नागरिक हे पाण्याचा तुटवडा व कमी दाबाच्या समस्येमुळे त्रस्त झाले होते. याविषयी अनेकदा तक्रारी प्राप्त झाल्या झाल्याने सिडको प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही काही ठोस अशी कार्यवाही झाली नाही, म्हणून खारघरचे नगरसेवक, भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांना घेराव घातली. तसेच पाण्याच्या समस्येबद्दल जाब विचारुन सदर समस्या लवकरात लवकर न सुटल्यास मोठ्या स्वरूपाचा मोर्चा सिडकोवर काढण्याचा इशारा दिला. यावेळी प्रभाग समिती (अ) चे माजी सभापती अभिमन्यू धर्मा पाटील, नगरसेवक प्रवीण काळुराम पाटील, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेशजी पटेल, भाजप पदाधिकारी कीर्ती नवघरे, किरण पाटील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.