Breaking News
मनसेची मागणी ; दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करा
नवी मुंबई ः नागरी कामांमध्ये नगरसेवक टक्केवारीची मागणी करत असल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत सुरु आहे. या टक्केवारीच्या राजकारणाची दखल पालिका प्रशासनाने न घेतल्याने मनसेने आपली भुमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली आहे. टक्केवारी प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच दोषी नगरसेवकांना निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध करण्याची मागणी मनसेने केली आहे.
कोपरखैरणेतील काही नगरसेवकांनी प्रभागामध्ये होत असलेल्या नागरी कामांमध्ये कंत्राटदाराकडून टक्केवारीची मागणी केल्याची चर्चा आहे. महानगरपालिकेच्या नागरी कामांमध्ये अशी टक्केवारी दिली जाते अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु असते. याविषयीच्या बातम्याही प्रकाशित झाल्या आहेत. त्याची दखल महानगरपालिकेने, पोलीस प्रशासनाने, राज्य सरकारने, लाचलुचपत प्रतिबंध विभागाने घेणे आवश्यक होते. पण अशा प्रकारची कोणतीही दखल घेतली असल्याचे दिसून आले नाही. या संपूर्ण टक्केवारीच्या राजकारणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
नगरसेवक, कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांच्या माध्यमातून हे कथित टक्केवारीचे राजकारण नवी मुंबईत सुरु आहे असा आरोप शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला. या टक्केवारीमुळे कंत्राटदार जास्त दराने कंत्राट घेतात आणि निकृष्ट दर्जाची नागरी विकासकामे नवी मुंबईकरांच्या माथी मारतात. अशा टक्केवारीमुळे नवी मुंबईची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे. नाशिकमध्ये मनसेने विविध कंपन्यांकडून यांचा व्यावसायिक सामाजिक जबाबदारीसाठी राखीव असलेल्या निधीतून (सी. एस. आर फंड) शेकडो करोडची कामे आपल्या कार्यकाळात केली. अशा कामात कोणतीही टक्केवारी मिळत नाही. नवी मुंबईत 3500 हुन जास्त कंपन्या असताना अशी कामे मुद्दाम केली जात नाहीत, असा स्पष्ट आरोप शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला. त्यामुळे या टक्केवारीच्या राजकारणासंदर्भात संपूर्ण प्रकरणाची महानगरपालिका, लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांनी सखोल चौकशी करावी, दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि दोषी नगरसेवकांना निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध करावा या प्रमुख मागण्या मनसेने केल्या आहेत. मनसेच्या या पत्रकार परिषदेत उप शहरअध्यक्ष प्रसाद घोरपडे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजित देसाई, अमोल इंगोले, शरद दिघे, पालिका कामगार सेना शहरअध्यक्ष अप्पासाहेब कौठुळे, मनविसे शहरअध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहरअध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, शारीरिक सेना शहरअध्यक्ष सागर नाईकरे, विभागअध्यक्ष अमोल आयवले उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai