अर्थसंकल्पात मालमत्ताकर व पाणीपट्टी वाढवू नये

आ. गणेश नाईक यांची पालिकेला सुचना ; कोरोना लस खरेदीसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी

नवी मुंबई ः नवी मुंबईच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर किंवा पाणीपट्टीत कोणतीही वाढ करू नये, अशी सुचना आमदार गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. त्याचबरोबर नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत देण्यासाठी 150 कोटी रूपयांची तरतूद या बजेटमध्ये करावी, अशी महत्वाची मागणी देखील त्यांनी केली आहे.

पालिकेच्या अर्थसंकल्पासाठी आमदार नाईक यांनी नवी मुंबईतील विकासाच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण सुचना केल्या आहेत. या सुचनांचे निवेदन बुधवारी माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी विरोधीपक्षनेेते दशरथ भगत, माजी नगरसेवक अनंत सुतार, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, नगरसेवक सुनिल पाटील आदीं मान्यवरांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले. या सुचनांचा समावेश येत्या बजेटमध्ये करावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली. पालिकेत आ. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे. त्यांच्या सुचनेनुसार मागील 20 वर्षे महापालिकेने एकदाही  मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ केली नाही. यापुढील पाच वर्षे देखील प्रॉपर्टी आणि वॉटर टॅक्समध्ये कोणतीही वाढ करू नये, यासाठी ते आग्रही आहेत. कोरोना काळात सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजचे खर्च भागवताना नाकीनऊ येते आहे. अशा संकटकाळात नागरिकांवर करवाढीचा बोजा टाकणे योग्य होणार नाही. ज्याप्रमाणे मागील 20 वर्षे मालमत्ता व पाणीकर न वाढवता जनतेला दिलासा देण्यात आला आहे त्याप्रमाणे यंदाच्या बजेटमध्ये देखील दिलासा द्यावा असे नमूद करून अन्य स्त्रोत शोधून त्यामधून पालिकेने आपले उत्पन्न वाढवावे, असा सल्ला आ. नाईक यांनी दिला आहे.

आ.नाईक यांनी भविष्यात नवी मुंबईत आवष्यक पायाभूत, दळणवळणाची कामे, नागरी सुविधा, भविष्यातील शहराच्या गरजांनुसार सांप्रत काळात हाती घ्यावयाचे प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, परिवहन सेवा, महिला, युवक व ज्येष्ठांच्या कल्याणाच्या योजना इत्यादी विषयी त्यांच्या दुरदर्शी विकास धोरणांनुसार मौलिक सुचना केलेल्या आहेत. या सुचना उपयुक्त असून त्यांचा निश्‍चितच विचार केला जाईल, असे मत आयुक्त बांगर यांनी यावेळी मांडले.

मोफत कोविड 19ची लस द्या
सर्व नवी मुंबईकरांना मोफत कोविड 19ची लस द्यावी, अशी मागणी आ. नाईक यांनी सुरूवातीपासून केली आहे. आता कोरोना लस खरेदीसाठी पालिकेने अर्थसंकल्पात 150 कोटी रूपयांची तरतूद करावी, अशी सुचना केली आहे. दुसर्‍या टप्प्यातील लसीकरण संपल्यानंतर सर्वसामान्यांना लसीकरण केले जाणार आहे. मात्र प्रती व्यक्ती एक हजार रूपये खर्चून कोरोनाच्या संकटकाळात लस घेणे परवडणारे नाही. त्यामुळे महापालिकेनेच ही लस सर्वांना मोफत द्यावी आणि आपली जन कल्याणकारी जबाबदारी पार पाडावी अशी विनंती आ. नाईक यांनी केली.