पुन्हा एकदा मगर दिसल्याने भीतीचं वातावरण

नवी मुंबई : नवी मुंबई मनपा मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या बेलापूर खाडीत पुन्हा एकदा मगर आढळुन आल्यामुळं नागरिकांसह मच्छीमारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या पुर्वीच मगरीच्या बंदोबस्तासाठी वन विभागाकडे मागणी करुनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने मगर दर्शनामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 

मागील वर्षी, म्हणजेच ऑगस्ट महिन्यात नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या खाडीत एक मगर आढळून अली होती. या मगरीला पकडून इतरत्र स्थलांतरीत करावे म्हणून बेलापूर गावातील स्थानिक नागरीकांनी वन विभागाकडे  मागणी केली होती. मात्र वन विभागाने स्थळ पाहणी करून देखील तिचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलीच कारवाई केली नाही. हे सत्र असंच सुरु असल्यास भविष्यात असा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास यासाठी जबाबदार कोण, असाच प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. मगर दिसण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 

मगरीला सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येत नसल्यामुळं या भागात मासेमारी करणार्‍या मच्छिमारांमध्ये आणि स्थानिक नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे या मगरीला वनविभाने तात्काळ पकडून इतरत्र स्थलांतरित करावे अशीच मागणी मच्छीमारांनी केली आहे. मुख्य म्हणजे नवी मुंबई भागात असणारा खाडीच्या भागात पावसाळ्यात पाण्याची पातळी अधिक असते. पण, सध्या पाण्याची पातळी कमी असल्यामुळं या मगरीचे सहज दर्शन होत आहे. इतकंच नव्हे, तर या भागानजीक असणार्‍या मैदानी भागात किंवा मानवी वर्दळीमध्ये मगर गेल्यास मोठा धोका संभवू शकतो ही बाब नाकारता येणार नाही. वन विभागाचे ठाणे प्रादेशिक पथक आल्यानंतर मगरीचा बंदोबस्त करण्यात येईल अशी माहिती वन विभागाने दिली.