सलग 21 वर्ष करवाढ न करणारी देशातील पहिली महानगरपालिका

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन 2020-21 च्या 4709 कोटीं रुपयांचा सुधारित आणि सन 2021-22 चा 4825 कोटींचा मूळ अर्थसंकल्पाला प्रशासक व आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी मंजुरी दिली. या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य सेवा व घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आल्याचे यावेळी आयुक्त बांगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या अर्थसंकल्पात पालिकेने कोणतीही करवाढ केली नसल्याने सलग 21 वर्षे करवाढ न करणारी नवी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. 

पालिका प्रशासक अभिजीत बांगर यांनी गुरुवारी 4825 कोटी रुपयांचा जमेचा व 4822 कोटी खर्चाच्या अर्थसंकल्पास मंजूरी दिली. या अर्थसंकल्पात अनेक जूने प्रकल्प पुर्ण करण्याचा संकल्प केला असून त्याचबरोबर अनेक नवीन कामांसाठी तरतूद केली आहे. पालिका यावेळी माझी वसूंधरा अभियान, स्वच्छ भारत अभियानातंर्गत  जनजागृती व लोक सहभाग उपक्रम राबविणार आहे. शहर सुशोभिकरणासोबत आरोग्य सेवा, अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी या अंदाजपत्रकात विशेष लक्ष देण्यात आले आहे. पहिल्यांदाच अंदाजपत्रकाच्या 10.35 टक्के एवढी रक्कम आरोग्य विभागावर खर्च करण्यात येणार आहे. कोरोना संक्रमणानंतर आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व सर्वानाच जाणवल्याने यावेळी 21.90 कोटींची भरीव तरतूद आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे व हा विभाग अद्यावत करण्यासाठी करण्यात आली आहे. शहरातील  कार्बन कन्टेंट कमी व्हावा म्हणून अजून 50 ईलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे इंधन बचत होऊन पर्यावरण संतूलन राखले जाईल. 

पालिका हद्दीत आगामी काळात पुनर्विकासाच्या माध्यमातून 70 मीटर उंच इमारती उभ्या राहण्याची शक्यता गृहित धरुन नवीन फायर फायटींग वाहने खरेदी करण्यासाठी तसेच या विभागातील कर्मचार्‍यांचा फिटनेस टिकून राहावा म्हणून व्यायामशाळा सुरु करण्यासाठी 58 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वेगवेगळ्या सेवासुरिधांसाठी अनेक तरतूदी या अर्थसंकल्पात पालिकेने केल्या आहेत. परंतु हे सर्व करत असताना कोणत्याही प्रकारची करवाढ पालिकेने नवी मुंबईकरांवर लादली नाही याचे स्वागत नागरिकांनी केले आहे. गेली 21 वर्ष कोणत्याही प्रकारची करवाढ न करणारी ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.  या अर्थसंकल्पाबरोबरच नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम व वृक्ष प्राधिकरणाचेही अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तसेच अंदाजपत्रक निर्मितीत महत्वाची भूमिका असणारे महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते. 

वृक्ष प्राधिकरण 37.71 कोटी
रस्त्याच्या दुतर्फा झाडांचे संरक्षण करणे, पालिका क्षेत्रात हरितपट्टी निर्माण करणे, खारफुटींचे संवर्धन, रोपवाटिका विकसीत करणे, उद्यान प्रदर्शन आयोजित करणे, वृक्षांचे पुर्नरोपण करणे, मोरबे धरण परिसरात 40 हजार झाडांची लागवट करणे, रस्ता दुभाजकांमध्ये झाडे लावणे, वृक्षमित्र पुरस्कार देणे यासांठी तरतूद करण्यात आली आहे. 
परिवहन 
 सन 2021-22 चे अर्थसंकल्पात नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमासाठी एकूण रू. 150.00 कोटी अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

नवी मुंंबईकरांना 20 वर्षे करवाढ करणार नाही असे आश्‍वसन मी 2000 साली पालिका निवडणूकीत दिले होते. मी दिलेले आश्‍वासन गेली 20 वर्षे कसोशिने पाळले असुन नवी मुंबईकरांना कोणत्याही प्रकारच्या सेवा व सुविधांमध्ये कमतरता येऊ दिली नाही. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने केेलेल्या कामामुळे हे शक्य झाले आहे. यावेळीही करवाढ करणार नाही असे आश्‍वासन मी जानेवारी 2020 साली दिले होेते. पालिका आयुक्तांची भेट घेवून कोरोना संक्रमणामुळे नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादू नये अशी विनंती त्यांना केली होती. आयुक्तांनी यावेळीही कोणतीही करवाढ नवी मुंबईकरांवर लादली नाही याचे मी स्वागत करतो. - गणेश नाईक, आमदार

जमा (सन 2021-22)
तपशिल रू. लाखात
स्थानिक संस्था कर 140146.45
मालमत्ता कर 60000.00
विकास शुल्क 20000.00
पाणी पट्टी 12276.00
परवाना व जाहिरात शुल्क 1006.82
अतिक्रमण शुल्क 460.00
मोरबे धरण व मलनिःसारण 4106.10
रस्ते खोदाई शुल्क 2915.00
आरोग्य सेवा शुल्क 1134.06
केंद्र/राज्य शासन योजना 50552.96
संकीर्ण जमा 27160.06
आरंभिची शिल्लक 162742.64
एकुण 482500.09


खर्च (सन 2021-22)
तपशिल रू. लाखात
नागरी सुविधा 156169.29
प्रशासकीय सेवा 73763.34
पाणी पुरवठा, मलनिःसारण 57945.32
इतर नागरी सुविधा 44353.02
ई-गव्हर्नन्स 12715.32
सामाजिक विकास 4840.94
स्वच्छ महाराष्ट्र व घनकचरा
व्यवस्थापन, क्षेपणभुमी 38400.52
केंद्र/राज्य शासन योजना 8928.00
आरोग्य सेवा 27667.13
परिवहन 15100.00
आपत्ती निवारण,अग्निशमन 8042.00
शासकीय कर परतावा 12100.00
शिक्षण 17138.21
कर्ज परतावा 3815.00
अतिक्रमण 1252.00
एकूण 482230.09