कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

नवी मुंबई ः राज्यासह एमएमआर क्षेत्रातील कोव्हीड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता संभाव्य संकटाला वेळीच रोखण्यासाठी कोव्हीड नियमांचे उल्लंघन करून वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्याला धोका पोहचविणार्‍या बेजबाबदार नागरिक व संस्थांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

17 फेब्रुवारीला विभाग अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या वेब बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा संबंधित सर्व घटकांशी संवाद साधत आयुक्तांनी स्वच्छ सर्वेक्षण व निवडणूक प्रक्रियेचे कालमर्यादीत महत्वाचे काम सुरू असले तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्वाचे असलेल्या कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी तत्पर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे काम सतर्क राहून करण्याचे आदेश दिले. कोव्हीड लसीकरण सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये कोव्हीड सुरक्षा नियमांची मास्क, सुरक्षित अंतर व सतत हात धुणे ही त्रिसूत्री पालन करण्याबाबत काही प्रमाणात शिथीलता आल्याचे लक्षात घेता जोपर्यंत सर्व नागरिकांना लसीकरण पूर्ण होत नाही व कोव्हीड रूग्णांची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे याची जाणीव नागरिकांना असणे गरजेचे आहे. त्यामुळे कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन हे स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याला धोकादायक आहे हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी सूचित केले आहे.

दक्षता भरारी पथके पुन्हा कार्यान्वित
यादृष्टीने कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात गठीत केलेली नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांची संयुक्त दक्षता पथके आजपासून पुन्हा एकवार कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पथकांनी लग्न तसेच इतर सामाजिक कार्यक्रम होतात अशा किमान 4 ठिकाणी दररोज अचानक भेटी देऊन तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच या दक्षता पथकांमार्फत मार्केट व इतर वर्दळीच्या ठिकाणी धाडी टाकून मास्क, सोशल डिस्टन्सींग आदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
लग्न व सार्वजनिक समारंभात खबरदारी घ्या  
सभागृहात संपन्न होणारे लग्न व इतर समारंभ आयोजनासाठी उपस्थितीचे बंधन पालन करणे गरजेचे आहेच, त्यासोबतच मास्क, सोशल डिस्टन्सींग सुरक्षा नियमांचे पालन करणेही अत्यंत गरजेचे आहे. या समारंभांवर दररोज लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागांचे सहा. आयुक्त आणि विभागात नियुक्त दक्षता पथके यांच्यावर निश्चित करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणार्‍या समारंभ आयोजकांप्रमाणेच सभागृह व्यवस्थापनाचीही जबाबदारी निश्चित करीत त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. नियम उल्लंघनाची तीव्रता लक्षात घेऊन प्रसंगी सभागृहाचे रजिस्ट्रेशनही रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
मॉल्स व्यवस्थापनांनी टोकन सिस्टीम सुरू करा 
मॉल्समध्ये होणारी गर्दी लक्षात घेता ’मास्क नाही तर प्रवेश नाही’ या नियमाप्रमाणेच त्याठिकाणच्या संख्येवर नियंत्रण राखण्यासाठी व सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे योग्य पालन होण्याकरिता मॉल्स व्यवस्थापनांनी टोकन सिस्टीम सुरू करावी असे आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत.
सोसायट्यांनी कोव्हीड प्रतिबंधाची घ्यावी संपूर्ण खबरदारी
सोसायट्यांमध्ये कोव्हीड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांची सोसायटी पदाधिकारी यांनी पुन्हा खात्री करून घ्यावी तसेच सोसायटीमध्ये कोरोनाबाधित व्यक्ती सापडल्यास त्यांच्या घरातील विलगीकरण केलेल्या व्यक्ती घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सोसायटीमधील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या पाहून नियमानुसार एखादा मजला वा संपूर्ण सोसायटी सील केली असेल तर त्याचे पालन करण्यासाठी सोसायटीमधील सर्व नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात येत आहे. संबंधित नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी याविषयी खबरदारी घ्यावी तसेच संबंधित विभागाच्या सहा.आयुक्तांनी येथील कन्टनमेंट क्षेत्राची नियमानुसार अंमलबजावणी करावी असे आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत.  
कॉन्टॅक्ट ट्रेसींगवर भर
‘मिशन ब्रेक द चेन’ ची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळेच नवी मुंबईतील कोव्हीड प्रतिबंधाला गती मिळाली. मिशनमधील ‘ट्रेस’ हा अत्यंत महत्वाचा घटक असून त्यावर अधिक लक्ष केंद्रीत करीत एखादी कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्यावर त्यांच्या संपर्कातील किमान 20 व्यक्तींची माहिती घेणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. आहे त्याचप्रमाणे चाचण्या करताना आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर द्यावा असेही निर्देश देण्यात आले आहेत.
प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करा
सामाजिक आरोग्याला आपल्यामुळे हानी पोहचणार नाही याची दक्षता घेत नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे व महानगरपालिकेला दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.