विजेचा शॉक लागून लहानग्याचा मृत्यू

नवी मुंबई : दुकानदाराचा हलगर्जीपणा एका लहान मुलाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये घडली. विजेचा धक्का लागून मुलाचा जागीच मृत्यू झाला असून मुलाच्या मृत्यूमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ऐरोली येथील शिवशंकर प्लाझा 2 येथील इमारतीच्या बाहेर लेन्सकार्ट दुकानासमोर कामानिमित्त लोखंडी परांची ठेवण्यात आली होती. त्या परांचीची उंची सुमारे 25 फुटाहुन अधिक असल्याने वरून जाणार्‍या विद्युत मेन लाईनला परांची चिटकली होती. त्या परांचीमध्ये करंट उतरला आणि तेथील सिग्नल वर पिशव्या विकणार्‍या एका लहान मुलाला  विद्युत शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. हा विजेचा झटका इतका भयानक होता की, 10 मिनिटात त्या मुलाचे शरीर जळून खाक झाले.

सदर घटना सोसायटीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सकाळी 8.30 वाजता घडली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन व एमएसइबीचे कर्मचारी हजर झाले. यामध्ये शिवशंकर प्लाझा 2 मधील लेन्स कार्ट व पीटर इंग्लंड या शॉपच्या रीपेरिंगचे काम सुरू असल्याचे समजले. याचा अधिक तपास करण्यात येत असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे एमएसइबीचे अधिकारी यांनी सांगितले. रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास करण्यात येत आहे.