कोरोनामुक्त चार रुग्णांचे यशस्वी यकृत प्रत्यारोपण

नवी मुंबई : कोरोना आजारातून बर्‍या झालेल्या चार रुग्णांवर यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या. या चारही रुग्णांना यकृताचा शेवटच्या टप्प्यातील आजार असल्याचे निदान झाले होते. तीन रुग्णांमध्ये प्रत्यारोपण झालेली यकृते ही हयात असलेल्या दात्यांकडून मिळविण्यात आली, तर एका रुग्णामध्ये प्रत्यारोपित झालेले यकृत हे एका मृत दात्याचे होते. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण झालेले हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत व त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. 

एक 37 वर्षीय पुरुष मागील 8 महिन्यांपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होता. बिघडलेल्या यकृतामुळे त्याला वारंवार जलोदर आणि रक्ताच्या उलट्या यांचा त्रास होत होता. त्याला तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. त्याचवेळी त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे त्याचे प्रकरण अधिक आव्हानात्मक बनले. कोरोना साथीपासून बचावाकरीता घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे खबरदारी घेत, नवी मुंबईतील अपोलो मधील यकृत प्रत्यारोपण करणार्‍या तज्ज्ञांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया संबंधित रुग्णावर यशस्वीरित्या केली.

इथेनॉलशी संबंधित विघटनशील क्रोनिक यकृत रोगाने ग्रस्त असलेला आणखी एक 36 वर्षीय रुग्णदेखील सतत ताप आणि मायल्जियासह अपोलो रुग्णालयात आला. ‘आरटी-पीसीआर’ चाचणी पॉझिटिव्ह आली. कोरोना पासून बरा झाल्यानंतर यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला तयार करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात आली. 

या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे, जिवंत-संबंधित दाता यकृत प्रत्यारोपणासाठी अयोग्य दाता मिळण्यासारख्या अनेक गुंतागुंतीच्या घटना उद्भवल्या. शल्यक्रिया होण्यापूर्वी आरटी-पीसीआर चाचणी घेऊन अवयवदात्याच्या यकृताचे आवश्यक ते मूल्यांकन करण्यात आले आणि रुग्णावर यकृत प्रत्यारोपण यशस्वी झाले. आता हा रुग्ण स्वस्थ आहे. याचप्रमाणे इतर केसेसमध्येही यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. 

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील हेपेटोलॉजी (अ‍ॅडल्ट एंड पॅडियाट्रिक्स) या विभागाच्या कन्सल्टंट डॉ. आभा नगराल म्हणाल्या,कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे हे मोठे आव्हान होते. कारण या रूग्णांमध्ये जंतूसंसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते. ही शस्त्रक्रिया करण्यासाठीची रुग्णांची मोठी प्रतीक्षा यादी कमी करणे आणि मृत्यूदर घटविणे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काही केसेसमध्ये कोरोनाची लागण झालेल्या व यकृताचा अखेरच्या टप्प्यातील आजार असलेल्या रुग्णांना विषाणू-संसर्ग होऊ नये म्हणून अतिकाळजी घेण्यात आली. प्रोटोकॉल पाळून, आम्ही जीवन वाचविण्यासाठी नेटाने उपचार केले आणि कोरोना पासून बरे झालेल्या चार रुग्णांवर यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले.