मतदार यादींवरुन राजकीय पक्षात यादवी

भाजप-राष्ट्रवादीत अर्थकारणावरुन आरोप-प्रत्यारोपांंच्या फैरी 

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच पक्षांतराबरोबर मतदार याद्याही चांगल्याच प्रकाश झोतात आल्या आहेत. मतदान यादीत 90 हजार बोगस नावे घुसवण्यासाठी  अधिकारी वर्गाने लाखो रूपये घेतले असल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक आणि शशिकांत शिंदे यांनी केला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने मतदार यादीवरुन केलेल्या गंभीर आरोपाने राजकीय पक्षातील यादवी समोर आल्याने मतदारांत संभ्रम निर्माण झाला आहे.  

16 फेब्रुवारीला नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या प्रारुप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणात महापालिका अधिकार्‍यांची मिलीभगत आहे. पालिका अधिकार्‍यांकडूनच मतदार यादीत फेरफार केला जात असल्याची तक्रार नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. मतदार याद्यांमध्ये अशाप्रकारे चुका केल्या गेल्या असतील तर त्या तातडीने सुधाराव्यात अन्यथा कार्यकर्त्यांसह महापालिकेला घेराव घालण्याचा इशाराही नाईक यांनी यावेळी दिला. शिवाय संबंधित प्रभाग अधिकारी, सहायक आयुक्त, आयुक्त, जिल्हाधिकारी, कोंकण आयुक्त विधान परिषद विरोधी पक्षनेते यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही नाईक यांनी सांगितलं. त्यावरही कारवाई न झाल्यास उच्च नायालयात धाव घेणार असल्याचा इशारा नाईक यांनी दिला आहे. 

दुसरीकडे प्रकाशित करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये 90 हजार बोगस मतदार घुसविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेवून केला आहे. बोगस नावे मतदान याद्यांमध्ये घुसविण्यात नवी मुंबईतील स्थानिक भाजपा नेत्यांचा हात आहे. यासाठी अधिकार्‍यांना हाताशी धरून एका मताच्या मागे दीड हजार रूपये देण्यात आल्याचा गंभीर आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. जोपर्यंत नव्याने फेर मतदार याद्या तयार केल्या जात नाहीत, तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. यापूर्वी शिवसेनेतील एक दाम्पत्य आरक्षणासाठी कोर्टात गेले होते. शिवाय संपूर्ण नवी मुंबईतील प्रत्येक यादीत पाचशे ते सहाशे बोगस मतदार असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे प्रभाग आरक्षण, प्रभाग रचना आणि याद्यांमध्ये पालिका अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

प्रारुप मतदार याद्यांमध्ये हेराफेरी
 प्रारुप मतदार याद्यांमधे मोठ्या प्रमाणावर हेराफेरी, बनवाबनवी करण्यात आली आहे. मंत्रालयात केबीनमध्ये बसून हे केले जात आहे. अशाप्रकारे सत्तेचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांनी 23 फेब्रुवारीला भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबईतील मतदार यादीत हेराफेरी होत असल्याचा दावा केला. महाविकास आघाडी सरकारने आता मतदार पळवापळवीचा अनोखा कार्यक्रम सुरु केला आहे. 3 मार्चपर्यंत जर कायदेशीर मार्गाने बदल केले नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.
खातरजमा करून अंतिम याद्या बनवणार
 नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने मतदान याद्यांची अंतिम प्रत बनविण्याच्या अगोदर सुचना आणि हरकती मागविल्या आहेत. यानुसार 3698 हरकती मनपा प्रशासनाकडे विविध पक्षांनी, नगरसेवकांनी लेखी स्वरूपात दिल्या आहेत. याबाबत योग्य ते पुरावे तपासून, प्रत्यक्ष मतदार संबंधीत पत्त्यावर राहतात का? याची खातरजमा करूनच त्यांची नावे मतदान यादीत समाविष्ट केली जातील.
एका प्रभागातील नावे दुसर्‍या प्रभागात
नवी मुंबईत 111 प्रभागात एका प्रभागातून दुसर्‍या प्रभागात नावे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. जो व्यक्ती ज्या प्रभागात राहतो तसेच त्याने गत निवडणुकीमध्ये त्या प्रभागामध्ये मतदान केले आहे, अशा व्यक्तींची नावे इतर प्रभागातील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.   सोसायट्या आणि चाळीमधील मतदारांची नावे इतर प्रभागात टाकण्यात आली आहेत, असा दावाही शेलार यांनी केला.