अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यास मुदतवाढ

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारुप मतदार यादी  करण्यात आली. त्यावर 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती / सूचना प्राप्त झाया आहेत. या हरकती व सूचनावर निर्णय घेऊन अंतिम यादी 3 मार्चपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र सदर प्रक्रिया 03 मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणे शक्य नसल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याची सुधारीत तारीख निश्चित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली. 23 फेब्रुवारी 2021 या अंतिम दिनांकापर्यंत एकूण 3497 हरकती / सूचना प्राप्त झालेल्या आहेत. सदर हरकती / सूचनांवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संक्षिप्त चौकशी करून पुढे आवश्यक तो निर्णय घेण्याकरीता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्येक विभाग कार्यालयाकरिता उप आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे. सदर समितीने प्रत्येक हरकती / सूचनेबाबत सखोल अभ्यास करून, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन व निर्णय घेताना पुराव्यासह योग्य कागदपत्रे तयार करून (उदा. व्हिडीओ चित्रीकरण, स्थळ पाहणीच्या वेळी काढलेले छायाचित्र इ.) तद्नंतरच वरील नमूद 3 मुद्द्यांना अधीन राहून आवश्यक तो निर्णय घेणेबाबत महापालिका आयुक्त यांचेमार्फत सर्व प्राधिकृत अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

हरकती / सूचनांवर निर्णय घेण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात यावे असे महापालिका आयुक्त यांनी समिती अध्यक्षांना निर्देशित केले असून त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. याबाबत 26 फेब्रुवारी 2021 रोजी राज्य निवडणूक आयोगाने असे आदेश दिले आहेत की, सध्या राज्यामध्ये कोव्हीड 19 च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी या कामांमध्ये व्यग्र असल्याने या हरकती व सूचनांवर आवश्यक तेथे सखोल चौकशी करून क्षेत्रभेटीव्दारे वस्तुनिष्ठ निर्णय घेण्याकरिता अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभागनिहाय मतदार यादीवर प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर प्रथम काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असल्याने सदर प्रक्रिया 03 मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणे शक्य दिसत नाही. त्यास अनुसरून राज्य निवडणूक आयोगामार्फत असे निर्देश दिले आहेत की, महानगरपालिकेने प्रथम प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर काळजीपूर्वक निर्णय घ्यावा व त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावा. अशी निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याची सुधारीत तारीख निश्चित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.