जगभरात 34 दशलक्ष मुलांना श्रवणदोष

जागतिक श्रवणदिन ; युनिव्हर्सल न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग महत्वाचे

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) 1000 पैकी 5 मुलांना गंभीर श्रवणदोष असतो. भारतात 27,000 पेक्षा जास्त मुले दरवर्षी श्रवणदोष सहित जन्मतात. श्रवणदोष किंवा श्रवणशक्ती बंद होणे याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते कारण ते दिसून येत नाही आणि अनेक प्रकरणी निदान विलंबाने होते. 

3 मार्च हा जागतिक श्रवणदिन म्हणून ओळखला जातो. या दिनानिमित्त तत्त्व मेहता या मुलाचे पालक रितेश व सोनिया मेहता हे त्यांच्या मुलाच्या श्रवणातील अडथळे आणि त्यानंतर कॉकलियर इम्प्लाण्ट केल्यावर आवाजाच्या जगातील प्रवेशाचा प्रवास सांगत आहेत. रितेश व सोनिया मेहता म्हणाले, ‘‘आम्हाला आमच्या मुलाला श्रवणात अडथळे आहेत असे कधी जाणवलेच नाही. पण तो आवाजाच्या दिशेने बघत नव्हता, आवाज दिल्यास त्याला प्रतिसाद देत नव्हता किंवा दरवाज्याची बेल वाजल्यास त्यालाही प्रतिसाद देत नव्हता त्यावेळी आम्हाला त्याच्या श्रवणशक्ती विषयी संशय आला. तत्त्व 8 महिन्यांचा झाल्यानंतर आम्ही स्पेशालिस्ट्सकडे त्याची तपासणी केली आणि आम्हाला समजले की त्याला ऐकायला येत नाही. हा आमच्यासाठी खुप मोठा धक्का होता. आम्हाला कॉकलियर इम्प्लाण्ट आणि श्रवणदोष असलेल्यांना या उपचाराचा कशाप्रकारे लाभ होतो याबाबत समजले. तत्त्वचे वयाच्या दुसर्‍या वर्षी पहिले कॉकलियर इम्प्लांट करण्यात आले, जो आमच्या कुटुंबासाठी जीवनाला कलाटणी देणारा क्षण होता. श्रवणाचे महत्त्व आणि संभाषण व भाषा विकासामधील त्याची भूमिका जाणून घेतल्यानंतर आम्ही तत्त्वचे दुसरे कॉकलियर इम्प्लाण्ट करण्याचे ठरवले, जे तो 6 वर्षांचा असताना करण्यात आले.’’ आज तत्त्व 10 वर्षांचा झाला आहे आणि तो अत्यंत धाडसी व हुशार मुलगा आहे. तो शालेय अभ्यास व अभ्यासेत्तर उपक्रमांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तो चांगल्या प्रकारे इंग्रजी व गुजराती भाषेमध्ये बोलू शकतो. तत्त्वच्या पालकांनी त्याच्यामध्ये इतरांपेक्षा वेगळे असण्याची भावना कधीच निर्माण होऊ दिली नाही, ज्यामुळेच तो इतका आत्मविश्‍वासू आहे. 

तत्त्वच्या प्रवासाबाबत सांगताना त्याच्या ऑपरेटिंग सर्जन मुंबईतील केईएम हॉस्पिटल येथील ईएनटी विभागप्रमुख डॉ. हेतल मारफातिया म्हणाले, ‘तत्त्व हा लवकर निदान झालेल्या भाग्यवान मुलांपैकी एक आहे, कारण तान्ह्या मुलासाठी कॉकलियर इम्प्लाण्टेशन करण्याचे योग्य वय 1 वर्षाखालील आहे. आपल्या देशामध्ये बहुतांश केसेसचे निदान उशिरा होते, म्हणूनच उपचाराला देखील विलंब होतो. श्रवणदोष असलेल्या सर्व रूग्णांची आवाज ऐकू येण्याच्या साहित्यासह एक चाचणी केली पाहिजे. हे योग्यरित्या घडले नाही तर त्यांना कॉकलियर इम्प्लाण्ट्ससह मदत करता येऊ शकते. प्रत्येक नवजात बाळाची श्रवणासंदर्भात चाचणी केल्यास श्रवणदोषाचे लवकर निदान होऊ शकते. जलद स्क्रिनिंग चाचणी आपल्याला श्रवणदोष आहे की नाही याबाबत सांगते. ‘पास’चा अर्थ असा की श्रवणशक्ती सामान्य आहे, पण चाचणीने ‘रिफर’ असे दाखवले तर सविस्तर चाचण्या करण्याची गरज असते. प्रत्येक नवजात बाळासाठी बीसीजी लस अनिवार्य आहे, अगदी याप्रमाणेच तान्ह्या बाळांसाठी हिअरिंग चाचणी देखील अनिवार्य केली पाहिजे.’    

युनिव्हर्सल न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंगमुळे (यूएनएचएस) नवजात बालकांमधील श्रवणदोषाचे लवकर निदान करता येते आणि ही चाचणी नवजात बालकांमध्ये श्रवणदोष शोधण्यासाठी आणि लवकर हस्तक्षेप करण्यासाठी महत्त्वाची आहे. इतर विकसित देशांमध्ये यूएनएचएस ही चाचणी सक्तीची आहे. परंतु ती भारतात केरळ वगळता नवजात बालकांसाठीच्या सक्तीच्या आरोग्य तपासणीच्या यादीत समाविष्ट नाही. तपासणी कार्यक्रम उपलब्ध नसल्यामुळे पालक मोठ्या काळासाठी भाषा, शिक्षण आणि अंदाज यांद्वारे श्रवणदोष शोधण्यावर अवलंबून असतात. या विलंबामुळे मुलांना साधारण 24 महिन्यांचा सर्वांगीण विकासाचा कालावधी मिळत नाही. त्याउलट, यूएनएचएसची अंमलबजावणी होणार्‍या देशांमध्ये सहा महिन्यांसारख्या अत्यंत कमी कालावधीत उपाययोजना करता येतात.

पालक, शिक्षक, काळजीवाहक, गार्डियन आणि डॉक्टर यांच्यासाठी मुलांमधील श्रवणदोषाची चिन्हे तपासणे आणि सुरूवातीच्या टप्प्यातच वैद्यकीय हस्तक्षेप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याची काळजी घेतली न गेल्यास श्रवणदोष हा मुलासाठी जीवनभराचा दोष ठरतो आणि त्यामुळे त्याच्यासमोर विकासाची आव्हाने, भावनिक समस्या, आत्मविश्वासासंबंधी संघर्ष आणि सामाजिक आव्हाने उभी राहू शकतात.