पालिका व पोलीस यांची एपीएमसीत धडक कारवाई

61 हजार 100 इतक्या दंडात्मक रक्कमेची वसूली

नवी मुंबई ः पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ए.पी.एम.सी. मार्केट या कोव्हीड प्रसाराच्या दृष्टीने सर्वाधिक जोखमीच्या ठिकाणी अचानक भेट देत प्रभावी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या नियंत्रणाखाली महापालिका व पोलीस अशी धडक कारवाई करत मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न राखणे अशाप्रकारे सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या 144 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

यामध्ये मास्क न वापरणार्‍या 51 जणांकडून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे रु. 25 हजार 500 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सुरक्षित अंतर न राखणार्‍या 83 व्यक्तींकडून प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे रु.16 हजार 600 तसेच 9 आस्थापनांकडून प्रत्येकी रु. 2000 प्रमाणे रु.18 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे याकरिता एका व्यक्तीकडून रुपये 1 हजार इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. अशाप्रकारे ए.पी.एम.सी. मार्केटमधील पोलीस व महापालिका यांच्या धडक मोहिमेतून रुपये 61 हजार 100 इतक्या दंडात्मक रक्कमेची वसूली करण्यात आलेली आहे. या मोहिमेमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त  विनायक वस्त तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर आणि इतर पोलीस व महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 सुरक्षा नियमांचे पालन न करून इतरांच्या आरोग्याला धोका पोहचविणार्‍या व्यक्तींना समज मिळावी याकरिता हा कारवाईचा बडगा यापुढे सतत उगारला जाणार असून नागरिकांनी कारवाईला सामोरे न जाण्यासाठी व स्वत:चे आणि इतराचे आरोग्य जपण्यासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.