दिवाळे गाव मासळी मार्केटचे भूमिपूजन

आ. मंदा म्हात्रे यांनी दिला 1 कोटी 25 लाख रुपयांचा आमदार निधी

नवी मुंबई : दिवाळे गावातील मासळी मार्केट हे भव्य व सुसज्ज असे निर्माण व्हावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून रु.1 कोटी 25 लाख व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून रु. 40 लाख अशा एकूण रु.1 कोटी 65 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्व सुविधांयुक्त उभारण्यात येणार्‍या मच्छी मार्केटचा भूमिपूजन सोहळा नुकताच फगवाले मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक अनंता बोस यांच्या हस्ते पार पडला. 

मासळीसाठी प्रसिद्ध असणार्‍या दिवाळे गावात विविध गावातून व शहरातून नागरिक मासे खरेदीसाठी येतात. मात्र या मार्केटची दुरवस्था झाल्याने मासळी विके्रत्यासह खरेदादारांची गैरसोय होत होती. वाहतुकीची होणारी कोंडी पाहता भव्य, सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त असे मासळी बाजार उभारावे अशी मागणी मच्छिमार संघाच्या वतीने करण्यात येत होती. सदर विषयी आमदार मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता. याकरिता आ. मंदाताईंनी गेली 2 वर्षे शासन दरबारी पाठपुरावा केला. सदर जागा वन विभाग अंतर्गत असल्याने तसेच सीआरझेडची अतिरिक्त परवानगीची आवश्यकता असल्याने उच्च न्यायालयात सदर प्रकरण हाताळावे लागले. परंतु हे सर्व अडथळे पार करून सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्याने मासळी मार्केट उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आ. म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून रु.1 कोटी 25 लाख रुपयांचा निधी याकरिता दिला आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेनेही सदर मार्केटकरिता रु. 40 लाख तरतूद केली आहे. त्यामुळे लवकरच सुसज्ज मासळी मार्केट उभारण्यात येणार आहे. मच्छिमारांच्या सर्व समस्या सोडविल्याने एकविरा मच्छी विक्रेता संघ व शिवाई महिला मच्छिमार संघाने आ. मंदा म्हात्रे यांचे आभार मानले. 

सदर मासळी मार्केट उभारण्याकरिता शासन दरबारी गेली 2 वर्षाचा सततचा पाठपुरावा तसेच सी.आर.झेड., वन विभाग व उच्च न्यायालय अशा विविध परवानग्या मिळविण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. आता अडथळे पार करून सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्याने मासळी मार्केट उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तसेच गावातील जेट्टी उभारणीकरिताही रु.10 कोटी प्रस्तावित असून गावात स्वच्छता अभियान राबविण्याची गरज असून ग्रामस्थांनीही पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले.