305 महिलांनी घेतला लसीकरणाचा लाभ

नवी मुंबई ः 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 4 कोव्हीड 19 लसीकरण केंद्रे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. या 4 केंद्रांवर 60 वर्षावरील ज्येष्ठ तसेच 45 वर्षावरील 305 कोमॉर्बीड महिलांनी लस घेतली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 3 महानगरपालिका रुग्णालये व 7 खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येत असून आजपासून यामध्ये आणखी 4 लसीकरण केंद्रांची भर घातली गेली आहे. (1) नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदिरानगर तुर्भे अंतर्गत नमुंमपा शाळा क्र.25 येथे, (2) नागरी प्राथमिक आरोग्य  केंद्र, चिंचपाडा ऐरोली मार्फत  नमुंमपा शाळा क्र.53 येथे, (3) नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खैरणे मार्फत नमुंमपा सीबीएसई  शाळा सेक्टर 11 कोपरखैरणे येथे, (4) नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशीगाव, सेक्टर 2, वाशी - अशा 4 लसीकरण केंद्रांमध्ये आजपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या 4 ठिकाणी केवळ आजच्या दिवशी महिलांचेच लसीकरण करण्यात आले असून यापुढील काळात येथे पुरुष व महिला असे दोघांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक  सूचनांनुसार या 4 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून सोमवार, बुधवार व शुक्रवार असे  आठवड्यातील तीन दिवस लसीकरण केले जाणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता विशेष लसीकरण केंद्रे स्थापित केल्याने अनेक महिलांनी या संकल्पनेची प्रशंसा करीत लसीकरणाचा लाभ घेतला.