मोकळे भुखंड सिडकोमार्फत साफ करण्याचे निर्देश

आयुक्तांचे निर्देश ; घणसोली विभागात स्वच्छतेची पाहणी

नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2021 ला सामोरे जाताना स्वच्छता आणि सुशोभिकरणाव्दारे नवी मुंबई शहराचे स्वरुप अधिक चांगले करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या स्वच्छता कार्याची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडून आकस्मिकरित्या केली जात असून मंगळवारी सकाळी 7.30 पासून घणसोली विभागामधील विकसित नोड, गांवगावठाण, झोपडपट्टी तसेच एम.आय.डी.सी. क्षेत्र अशा सर्व भागांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी येथील मोकळे भुखंड अस्वच्छ असल्याने ते सिडकोकडे पाठपुरावा करुन स्वच्छ करुन घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.  

घणसोली विभागाच्या विकासाला सर्वात शेवटी सुरूवात झाली असल्याने तेथील विकास प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सिडकोचे भूखंड पडून आहेत. घणसोली स्टेशनसमोरील सिडकोचे मोकळे भूखंड विकसित नसल्याने पडीक अवस्थेत असून त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा पोहचत आहे. यावरील अस्वच्छता दूर करण्यासाठी सिडकोकडे सुरु असलेला पाठपुरावा अधिक तीव्रतेने करून हे भूखंड स्वच्छ करून घ्यावेत अशा सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. त्याठिकाणच्या विहिरीचीही सफाई करणेबाबत त्यांनी सूचना केल्या.

नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये याकरिता नाल्यांच्या काठावर ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या संरक्षक जाळ्या रस्त्यांपासून काहीशा वर असल्यामुळे त्यामध्ये असलेले अंतर भरून काढावे असे आयुक्तांनी निर्देशित केले. घणसोलीतील गुणाली तलावाचा जलाशय तितकासा स्वच्छ नसणे व त्या शेजारील कंपोस्ट पिट कार्यान्वित नसणे याबद्दल नाराजी व्यक्त करत त्याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या तलावांची रंगरंगोटी व सुशोभिकरण चांगल्या रितीने झालेले असले तरी तलावांच्या जलाशयाची संपूर्ण स्वच्छता राखणे अतिशय महत्वाचे असल्याचे अधोरेखीत करीत तशा प्रकारच्या कार्यवाहीवर सर्व विभागांमध्ये काटेकोर लक्ष दिले जावे असे आयुक्तांनी निर्देशीत केले. अशाच प्रकारे रबाले एम.आय.डी.सी. भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते, पदपथ यांची कामे सुरु असून अनेक ठिकाणी आच्छादनाच्या हिरव्या जाळ्या दिसून येत नाहीत, याबाबत संबंधितांकडून तातडीने कार्यवाही करून घ्यावी व त्याठिकाणचे डेब्रिजही व्यवस्थित ठेवले जावे असे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे एम.आय.डी.सी. क्षेत्रात मुख्य रस्त्यांवर विविध ठिकाणी पडलेले बांधकाम व पाडकाम डेब्रिज उचलण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.