दुंदरे ते वाकडी रस्ता खड्ड्यात

पनवेल : तालुक्यातील दुंदरे गाव ते वाकडी फाट्यापासुन गावापर्यंतच्या पाच ते सात किलोमिटरच्या रस्त्याची  खड्डे पडल्याने अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्‍न प्रवाशांना पडत आहे. मागील दोन वर्षांपासून रस्त्याची हिच अवस्था असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. येत्या काळात जर रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर आंदोनलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. 

दुंदरे ग्रामपंचायत हि जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. येथे शासनाचे ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, पोस्ट कार्यालय व 12 वी पर्यंतचे शिक्षण देणारी रयत शिक्षण संस्था व जिल्हा परीषदेची शाळा आहे. वाकडी ते दुंदरे या रस्त्याची प्रतिवर्षी चाळण होत असते. येथील नागरिक शासनस्तरावर वारंवार रस्ता बनविण्याची मागणी करत आहेत. मात्र शासन या रस्त्याकड़े दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.   जिल्हा परिषदेकडून 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये केवळ 700 ते 800 मीटर रस्ता डांबरीकरण रस्ता हाऊ शकतो. यासाठी पंतप्रधान सड़क योजनेतून हा रस्ता बनविण्यासाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. साडे सात किलोमीटरचा हा रस्ता दोन टप्यामध्ये आहे. मात्र त्याला अद्यापही मंजूरी मिळाली नसल्याचे अधिकारी परदेशी यांनी सांगितले. चिंचवली येथील माजी उपसरपंच रमेश पाटील यांनी स्वखर्चाने दोन वेळा स्त्यावरील खड्डे भरले होते. मात्र तरी देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खड्डेमय झालेल्या रस्त्यामुळे नागरिक रास्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. रस्त्याकडे प्रशासन किंवा स्थानिक प्रतिनिधि लक्ष देत नसतील तर नागरिक आगामी काळत येणार्‍या मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेण्यार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.