हॉटेल्स रात्री 11 तर मॉल्ससाठी 10 ची डेडलाइन

नवी मुंबई : वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील हॉटेल्स, उपाहारगृहे, दुकाने आणि मॉल्सच्या वेळात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार हॉटेल्स व उपाहारगृहे रात्री 11 पर्यंत तर मॉल्स, दुकानांसाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिकेच्या वतीने उपाययोेजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून लग्न व सभासमारंभांवर निर्बंध आले आहेत. लग्नसोहळ्यासाठी पन्नास लोकांना उपस्थित राहण्याची मुभा आहे. त्यासाठी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यापाठोपाठ आता हॉटेल्स व दुकानांच्या वेळातसुध्दा बदल करण्यात आला आहे. दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांत घट झाल्याने हॉटेल्स, कॅफे, उपहारगृहे रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात आली होती. तर मॉल्स आणि सर्व प्रकारच्या दुकानांसाठी रात्रीच्या 11 पर्यंतची वेळ निर्धारित करण्यात आली होती. परंतु नव्या आदेशानुसार हॉटेल्स, कॅफे आणि उपाहारगृहे 50 टक्के क्षमतेसह रात्री 11 वाजेपर्यंतची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. तर मॉल्स आणि दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. 9 मार्चपासून नवीन आदेश लागू करण्यात आले आहेत. या नवीन वेळापत्रकाचे संबंधित व्यवस्थापनांनी पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.