कांद्याचे दर 18 ते 20 रुपयांवर

नवी मुंबई ः आवक कमी झाल्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घाऊक बाजारात प्रति किलो कांदा दर 45 रुपयांपर्यंत गेले होते. किरकोळ बाजारात तर 50 रुपयांनी कांदा विकला जात होता. त्यात हळूहळू घट झाली असून कांदा दर आता स्थिरावले आहेत.  एपीएमसीच्या घाऊक बाजारात कांद्याला 18 ते 20 रुपये प्रति किलो दर आहे. गेल्या आठवड्यात 25 ते 30 रुपये दर होते.

पावसामुळे या वर्षी उत्पादन कमी झाल्याने नवीन कांदा आवक कमी झाली आहे. त्यामुळे कांदा दरात अधूनमधून वाढ होत आहे. फेब्रुवारीमध्ये किरकोळ बाजारात कांदा दराने पन्नाशी पार केली होती. तर घाऊक बाजारात 40 ते 45 रुपयांपर्यंत पोहोचला होता. मागील आठवड्यात दरात घसरण होत दर 25 ते 30 रुपयांपर्यंत आले होते. सध्या एपीएमसी घाऊक बाजारात 95 कांदा गाड्या दाखल होत आहेत. बाजारात सध्या राज्यातील कांदा दाखल होत असून यामध्ये जुना गावरान कांदाही येत आहे. राज्यातील सर्व ठिकाणच्या बाजारात कांदे येत आहेत. तसेच परदेशी, गुजरात येथूनही आवक होत आहे. त्यामुळे दरात सात ते आठ रुपयांची घसरण झाली असून दर 18 ते 20 रुपये प्रति किलो आहेत. नाशिक आणि पुणे बाजारात कांद्याचे दर 10 ते 15 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.