महानिर्मितीची विक्रमी वीज निर्मिती

60 वर्षातील सर्वाधिक 10445 मेगा वॅट वीजनिर्मिती ; सलग दुसर्‍या दिवशी विक्रम

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याची विजेची वाढती मागणी पूर्ण करताना महानिर्मितीने मंगळवारी दुपारी एकूण 10445 मेगावॅट वीजनिर्मिती करुन औष्णिक वीजनिर्मितीमध्ये एक शिखर सर केले आहे. महानिर्मितीने 20 मे 2019 रोजीचा 10098 मेगावॅटचा उच्चांक मोडून महानिर्मितीच्या सुमारे 60 वर्षातील सर्वोच्च वीजनिर्मितीचा हा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. विविध समस्यांवर यशस्वीपणे मात करुन आगामी काळात याच प्रकारे सातत्याने 10,000 मेगावॅट वीज निर्मिती करुन नवनवे उच्चांक करण्यास महानिर्मिती सज्ज आहे, हेच या विक्रमी कामगिरीने दाखवून दिले आहे.  

महानिर्मितीने यापुर्वी 10,275 मेगावॅट वीजनिर्मिती साध्य केली होती. त्यात सातत्य राखत मंगळवारी दुपारी स्वतःचाच विक्रम मोडून 10,445 मेगावॅट वीजनिर्मितीची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यामध्ये औष्णिक वीज निर्मितीद्वारे 7994 मेगावॅट, वायू वीज निर्मिती केंद्राद्वारे 264 मेगावॅट तर जल विद्युत केंद्राद्वारे 2138 मेगावॅट आणि सौर ऊर्जा प्रकल्पामधून 50 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी महावितरणची विजेची मागणी 22,129 मेगावॅट होती. तसेच राज्याची एकूण वीजनिर्मिती 16,429 मेगावॅट इतकी होती. 10,000 पेक्षा जास्त वीजनिर्मितीचा आकडा पुन्हा गाठण्याची ही तिसरी वेळ आहे. 8 मार्च रोजीही महानिर्मितीने 10,097  मेगावॅट निर्मिती साध्य केली होती. राज्यातील उद्योग, व्यवसाय यांची वाढती विजेची मागणी तसेच सुरु होत असलेल्या उन्हाळ्यामुळे राज्याची विजेची मागणी वाढत आहे. महानिर्मितीने मंगळवारी विक्रमी वीज निर्मिती करुन वीजेची पूर्तता करण्यासाठी सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. प्रभावी इंधन व्यवस्थापन, उत्कृष्ट कार्यप्रणाली याद्वारे महानिर्मितीने कमीत कमी दरामध्ये वीज निर्मिती करुन राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी कोळसा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केलेले अथक प्रयत्न व महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्या नेतृत्वाखाली महानिर्मितीने केलेल्या अनेक सुधारणांमुळे महानिर्मितीला विक्रमी वीज निर्मितीची कामगिरी साध्य करता आली आहे.  

महानिर्मितीचे प्र.संचालक (संचलन) राजू बुरडे, संचालक (मायनिंग) पुरुषोत्तम जाधव, संचालक(वित्त) बाळासाहेब थिटे व प्र.कार्यकारी संचालक अभय हरणे यांनी या सामूहिक यशाबद्दल सर्व कर्मचारी, अभियंते, तंत्रज्ञ तसेच अस्थायी कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी पूर्ण महानिर्मिती परिवाराचे या अभूतपूर्व कामगिरीबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.