पाणथळ जागेच्या बाजूस डेब्रीज टाकण्यास मनाई

डेब्रीज भरारी पथकाची आयुक्तांची नोटीस

नवी मुंबई ः सेक्टर 27, नेरूळ येथील लोट्स जलाशयात डेब्रिज टाकले जात असल्याच्या तक्रारी सोशल मिडियावरून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांस सकाळी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आयुक्तांनी त्वरित सदर जागेला प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.

सेक्टर 27 येथील प्लॉट क्र. 2 हा सिडकोच्या मालकीच्या असून त्यावर डेब्रिज टाकणेबाबत सिडकोने महानगरपालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत याबाबतची परवानगी देताना पाणथळ जागेमध्ये डेब्रिज टाकू नये या शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात पाहणीमध्ये सदर पाणथळ जागेच्या बाजूला डेब्रीज टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सध्या डेब्रीज टाकण्याची कार्यवाही तात्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सदर परवानगीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पाणथळ जागेमध्ये डेब्रीज टाकण्यात येऊ नये असे नमूद केलेले असताना त्यावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी ही डेब्रीज भरारी पथकाची होती. त्यामुळे त्यांनी पर्यवेक्षण कामात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याने त्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आलेला आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.