कळंबोलीत हवा गुणवत्ता केंद्र

नवी मुंबई : पनवेल, खारघर, तळोजा, कळंबोली या दक्षिण नवी मुंबईत सर्वाधिक वायुप्रदूषण असल्याचे निदर्शनास आले आहे. कळंबोली येथे हवा गुणवत्ता यंत्र बसविण्याचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे. ही यंत्रणा आणि त्याचा सकृतदर्शनी प्रदूषणाची मात्रा दाखविणारा फलक लावण्याची परवानगी पनवेल महापालिकेने मंडळाला दिली आहे. त्यामुळे महिन्याभरात हे हवा तपासणी यंत्र कळंबोलीत लावले जाणार आहे. 

टीटीसी औद्योगिक वसाहतीतील तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात हवा व पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्याचे दृश्य परिणाम पाच ते सहा किलोमीटर अंतरातील सर्व रहिवाशांना सोसावे लागत आहे. या प्रदूषणाने कासाडी नदीची नासाडी झाल्याचा आक्षेप लवादाने घेतला असून रासायनिक कारखान्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. काही वर्षांपूर्वी या भागातील बेवारस कुत्र्यांचे देखील रंग बदलले होते. त्यामुळे या भागात प्रदूषणाची मात्रा जास्त असल्याचे अनेक वेळा सिद्ध होऊनही साधा हवा गुणवत्ता यंत्र लावण्यात आला नव्हता. तळोजातील या प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास हा खारघर व तळोजा येथील नव्याने राहण्यास आलेल्या रहिवाशांना सुरू झाला आहे. संध्याकाळच्या वेळेस सुटणारी दुर्गंधी रहिवाशांना नकोशी झाली आहे. येथील वातावरण या पर्यावरण विषयक संस्थेने डिसेंबरमध्ये या भागातील प्रदूषणाचा एक अहवाल तयार केला आहे. 

त्यात या भागात पीएम 2.5 या हवा प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने केवळ सात तास या भागात चांगली हवा मिळत असून इतर 17 तास हवा प्रदूषित असल्याचे आढळून आले आहे. याच संस्थेने जानेवारीत खारघर मधील मोक्याच्या ठिकाणी अडकवलेली पांढरी कत्रिम फुप्फसे दहा दिवसात काळी पडली होती. त्यामुळे या क्षेत्रातील प्रदूषणाची तक्रार या संस्थेने प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण मंत्री, पनवेल पालिका यांच्याकडे केली होती. मंडळाने या तक्रारीची दखल घेऊन किमान हवा तपासणी यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील प्रदूषणाची पातळी आता नागरिकांनाही पाहता येणार आहे.