‘कलाकारांच्या वाडी’त मराठी कलेचा जागर

मुंबई ः मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य, डोंबिवली) विभाग आणि डोंबिवली युवा कला मंच,(डोयुकम) यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून 28 फेब्रुवारी रोजी डोंबिवली ( प.) येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात हौशी कलाकारंानी मराठीतूनच आपली कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. 

या कार्यक्रमांतर्गत डोंबिवलीतील शहरातील 14 कलाकारांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाच्या सुरवातीस मराठी एकीकरण समिती डोंबिवली विभागाचे प्रमुख दिनेश सावंत यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ केला. कार्यक्रमाची शैली आगरी बोलीभाषा असल्याकारणे कलाकारांनी आगरी भाषेतून कला सादर करण्यावर भर दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सृष्टी सावंत यांच्या आगरी गाण्यावरील धडाकेबाज नृत्याने झाली. अथर्व गावडे आणि दिनराज आपोणकर या दोन तरुणांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालने केले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव गाजवलेल्या आकांक्षा रोडे या तरुणीने आगरी गाण्यावर बेली डान्स सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कैलास झगडे या हरहुन्नरी कलाकाराने दशावतारी स्त्री पात्र सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्याचसोबत अनुश्री आणि आयुषी देवस्थळी या दोन मुलींनी आगरी गाणी सादर करून कार्यक्रमात बहार आणली. कार्यक्रमादरम्यान मराठी कविता, नकला, गायन, इत्यादी कला सादर करून कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

कार्यक्रमाची सांगता साहिल पेडणेकर याच्या पियानिका वादनाने झाली. कलेतून मराठी भाषेचा उत्कर्ष व्हावा आणि संवर्धन व्हावे यासाठी सर्व कलाकारांनी मराठीतूनच कला सादर करावी असे आवाहन करण्यात आले होते आणि सर्व कलाकारांनीही याला उत्तम प्रतिसाद दिला. येत्या काळात कलाकारांची वाडी या कार्यक्रमाचे अजूनही प्रयोग करण्याचा मानस मराठी एकीकरण समिती, डोंबिवली चे अध्यक्ष दिनेश सावंत यांनी व्यक्त केला.