Breaking News
उरण ः भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील जमिन संपादीत केली होती. त्याबदल्यात प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे अमिष दाखवण्यात आले. मात्र अजून रोजगार न दिल्याने भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती भेंडखळ तर्फे बीपीसीएल भेंडखळ कंपनी गेट समोर बेमुदत धरणे उपोषण सुरु केले आहे.
उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल )ही केंद्र सरकार पुरस्कृत कंपनी कार्यरत असून बीपीसीएलने या प्रकल्पासाठी भेंडखळ गावातील 207 एकर जमीन संपादित केली. त्याबदल्यात प्रकल्पग्रस्तांना नोकरीं व इतर आश्वासने देण्यात आली. मात्र बीपीसीएल प्रशासनाने ते आश्वासन पूर्ण केले नाही. आता तर या कंपनीत परप्रांतीय कर्मचार्यांचा खूप मोठा भरणा आहे. स्थानिकांना मात्र नोकर भरती पासून वगळले जाते. बेरोजगार प्रकल्पग्रस्तांनी कंपनी प्रशासनाशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला पण बीपीसीएल कंपनी प्रशासनाकडून कोणतेही योग्य असा प्रतिसाद मिळाला नाही. भेंडखळ गावातील बेरोजगार प्रकल्पग्रस्त तरुणांना या कंपनीने कामावर रुजू करून घेण्यास विरोध दर्शविल्याने या कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती भेंडखळचे अध्यक्ष अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बीपीसीएल गेटसमोर फिजिकल, सोशल डिस्टन्स पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून बेमुदत उपोषणाला सुरवात झाली असून या उपोषणाचा आज दि 15 मार्च पहिला दिवस आहे. भेंडखळ गावातील उर्वरित बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांना त्वरीत नोकरीत सामावून घ्यावे, नोकरी मिळेपर्यंत प्रकल्पग्रस्तांना 20, 000 रुपये निर्वाह भत्ता चालू करणे, अपंग व्यक्तींच्या वारसांना त्वरीत नोकरीत सामावून घ्यावे या प्रमुख मागण्या आहेत. या बेमुदत धरणे उपोषणाला उरण मधील विविध सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या, संघर्ष समितीचे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे बेमुदत धरणे उपोषण असेच सुरु राहणार असल्याचे सांगत उद्या कोणाचे बरेवाईट झाल्यास त्याला बीपीसीएल कंपनी प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल ठाकूर यांनी बीपीसीएल कंपनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai