चिमुकल्याला पळवून नेणारी महिला सहा तासात जेरबंद

उरण पोलिसांनी केली बाळाची सुखरुप सुटका 

नवी मुंबई : पोलीओ लस देण्याच्या बहाण्याने एका महिलेने उरणच्या नवघर भागातील 3 महिन्याच्या बाळाला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. मात्र उरण पोलिसांनी अवघ्या सहा तासात या महिलेचा शोध घेऊन तिला खांदा कॉलनी परिसरातुन ताब्यात घेऊन बाळाला तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे. मुलबाळ होत नसल्याने सदरच्या महिलेने या बाळाला पळवून नेल्याचे तपासात आढळुन आले आहे. बाळाला सहा तासाच्या आत शोधुन काढल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.  

या घटनेत ताब्यात घेण्यात आलेली महिला मुळची जालना जिह्यातील असून ती सध्या उरणमधील जासई भागात पतीसह राहाण्यास आहे. या महिलेचा पती ट्रक ड्रायव्हर असून तीच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. मात्र तीला मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सदर महिला उरणच्या नवघर भागात गेली होती. यावेळी 3 वर्षाची मुलगी आपल्या 3 महिन्याच्या भावाला घेऊन घराबाहेर बसली असताना, या महिलने बाळाला पोलीओ डोस देण्यासाठी अंगणवाडीत नेण्याचा बहाणा केला. मुलीला तयारी करण्यास घरात पाठवून दिले बाळाला घेऊन सदर महिलेने तेथून पलायन केले. काही वेळानंतर बाळाला पळवून नेल्याचे बाळाच्या आईला समजल्यानंतर तीने तत्काळ उरण पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, तत्काळ बाळाला पळवून नेणार्‍या महिलेचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले. सदर महिला बाळाला घेऊन रिक्षातुन पनवेलच्या दिशेने गेल्याचे पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी उरणसह पनवेल भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत, सदर महिलेचा माग काढला. त्यानंतर सदर महिला सायंकाळी खांदा कॉलनी येथील कृष्णा हॉस्पीटल येथे पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन तिने पळवून नेलेल्या बाळाची सुटका केली.