थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी सिडकोची अभय योजना

नवी मुंबई ः सिडको महामंडळातर्फे 51व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी संबंधित अनुज्ञप्तीधारक/पट्टेदार, बांधकामधारक, सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्याकरिता अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. सदर अभय योजना ही वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षाच्या कालावधीकरिता सिडको कार्यक्षेत्रात वैध असणार आहे. या कालावधीत सेवा शुल्क भरणार्‍यांना विलंब शुल्कामध्ये सूट देण्यात येणार आहे.   

ज्या अनुज्ञप्तीधारक/पट्टेदारांचे विलंब शुल्क वगळता सेवा शुल्क हे रु. 1 कोटीहून अधिक नाही अशांकरिताच सदर अभय योजना लागू असणार आहे. सदर अभय योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत सेवा शुल्क भरणार्‍या अनुज्ञप्ती/भाडेपट्टाधारकांचे 75% विलंब शुल्क माफ करण्यात येईल. अभय योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर परंतु 12 महिन्यांच्या आत सेवा शुल्क भरणार्‍या अनुज्ञप्तीधारक/पट्टेदारांना विलंब शुल्कामध्ये 50% सूट देण्यात येईल. कोरोना महामारीमुळे व टाळेबंदीमुळे सर्वच क्षेत्रे प्रभावित झाली असल्यामुळे सिडको महामंडळातर्फे अनुज्ञप्तीधारक/पट्टेदारांना दिलासादायक ठरणारी सदर अभय योजना आणण्यात आली असल्याचे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. 

सिडको महामंडळ सिडको अधिकार क्षेत्रात रस्ते, मलनि:सारण व्यवस्था, पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे, घन कचरा व्यवस्थापन यंत्रणा, पथदिवे इ. नागरी सुविधा पुरविण्याचे आणि त्यांची देखभाल करण्याचे काम करीत आहे. या सुविधांच्या बदल्यात सिडकोकडून भूखंडांचे अनुज्ञप्तीधारक/पट्टेदार, सहकारी गृहनिर्माण संस्था, बांधकामधारक यांच्याकडून दर तीन महिन्यांनी सेवा शुल्क आकारले जाते. सेवा शुल्काच्या वसुलीसाठी भाडेपट्टा करारनामा तसेच भाडेपट्टा विलेखामध्ये अनुज्ञप्तीधारक/पट्टेदार यांनी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे 1 एप्रिलला सेवा शुल्क आगाऊ भरावे, असे नमूद आहे. तसेच महामंडळाकडून सेवा शुल्काच्या वसुलीसाठी दर महिन्याला देयके पाठवली जातात. हर प्रकारे प्रयत्न करूनही अनेक अनुज्ञप्तीधारक/पट्टेदार हे सेवा शुल्क न भरणारे कसूरदार असल्याचे आढळून आले आहे. कोरोनामुळे जाहीर करण्यात टाळेबंदीमुळे बहुतांश अनुज्ञप्तीदार/पट्टेदार यांना सेवा शुल्काचा भरणा करणे कठीण झाले होते. अशा सर्व बाबींचा विचार केला असता भाडेपट्टा करारनामा/भाडेपट्टा विलेखाचा भंग नियमितीकरण करण्यासाठी महामंडळाने विलंब शुल्कावर विशिष्ट सवलत देत सेवा शुल्क वसुलीसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.