फसव्या हापुसची बाजारात चलती

देवगड, रत्नागिरीसह कर्नाटक व केरळचा आंबा दाखल 

नवी मुंबई ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याबरोबरच कर्नाटक आणि केरळचा आंबा देखील बाजारात दाखल झाला आहे. याचा गैरफायदा घेऊन काही किरकोळ व्यापारी कोकणच्या हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकत असल्याने ग्राहकांची फसवणुक होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी पारख करुन हापूस खरेदी करावा. 

आंब्याची आवक दिवसागणिक वाढतच असल्याने आंब्याचे दर देखील वाढले आहेत. आगामी काही दिवसात आवक स्थिरावल्यानंतर आंब्याचा आनंद सामान्यांना घेता येईल, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातून सूमारे 23037 तर इतर राज्यातून 6582 क्रेट आंबा बाजारात दाखल झाला आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची अधिक आवक बाजारात दाखल झाली आहे. त्याचबरोबर  कर्नाटक आणि केरळचा आंबा देखील बाजारात आला आहे. कोकणातल्या हापूसचा भाव 800 ते 1 हजार रुपये डझन आहे. तर कर्नाटकच्या आंब्याचा भाव 150 ते 200 रुपये किलो आहे. केरळचा आंबा देखील 500 ते 600 रुपये डझनानं विकला जात आहे.

रत्नागिरी हापूस आंबा बाजारात दिवसेंदिवस वाढत चालला असून लवकरच आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येणार असल्याची खात्री दिली जात आहे. इतर फळ विक्रीला ग्राहकांचा प्रतिसाद कमी असला तरी फळांच्या राजाला मात्र मागणी वाढू लागली आहे. याचा गैरफायदा काही व्यापारी घेत आहेत. कोकणातल्या हापुसच्या नावाखाली कर्नाटकी हापूस खपवला जात आहे. त्यामुळे ग्राहकांसह कोकणातल्या हापूस उत्पादकांना या फसवणुकीचा फटका बसत आहे.  कर्नाटक आणि केरळातला आंबा हापूसप्रमाणेच दिसायला असल्यानं ग्राहकांची फसगत होत आहे. व्यापार्‍यांकडून हापूसची खरेदी करीत किरकोळ विक्रेते हे फिरतीवर हापूसच विक्री करीत असतात. यासाठी ते फेरीवाल्यांची मदत घेतात. त्यांना पेटीमागे दलाली दिली जाते. हे विके्रते ही पेटी भरताना खाली कर्नाटकी आंबा आणि वर हापूसच्या आंब्याचा थर लावतात. त्यामुळे पेटी उघडल्यानंतर ग्राहकाला हे समजत नाही. सध्या बाजारात 1665 क्विंटल हापूस आवक होत आहे, तर कर्नाटक आंब्याच्या दोन गाड्या आवक सुरू आहे.