रायगडमध्ये कोरोना प्रतिबंधक सुधारित आदेश

अलिबाग : कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे उद्भवलेली परस्थिती विचारात घेता, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सिनेमा गृह, नाट्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट ही 50 टक्के इतक्या बसण्याच्या क्षमतेच्या मर्यादेत खालील प्रतिबंधाचे पालन करण्याच्या अधिनतेने सुरू राहतील. सिनेमागृह व नाट्यगृहामध्ये खाण्यायोग्य पदार्थ नेण्यास मनाई असेल, फेस कव्हर/मुखवटे परिधान केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, ताप असलेला व्यक्ती प्रवेश करणार नाही याची खात्री करण्याकरीता थर्मल स्कॅनिंग व्यवस्था करणे आवश्यक राहील, सॅनिटायझर, हॅन्डवॉश सोयीस्कर जागी ठेवणे आवश्यक राहील. सर्व दुकाने व शॉपिंग मॉल यासारख्या आस्थापनांनी खालील प्रतिबंधाचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच त्यांच्याद्वारे आवश्यक सामाजिक अंतर राखले जात आहे, याची पडताळणी करण्याकरिता प्रमाणात कर्मचारीवृंद नियुक्त करावा. सर्व प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, करमणूक, धार्मिक बाबी इत्यादी निगडीत कार्यक्रम, समारंभ, सण, उत्सव, ऊरुस, जत्रा, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने इ. यांचे आयोजन करण्यास मनाई राहील व याचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली जागेचे अथवा भालमत्तेचे मालक हे दंडात्मक कारवाईस पात्र राहतील. गृह अलगीकरणाची माहिती ज्या वैद्यकीय व्यवसायिकाच्या देखरेखीखाली ते करण्यात येत आहे, याच्या तपशिलासह स्थानिक प्राधिकरणास देणे बंधनकारक राहील, रुग्ण असल्यासंदर्भात फलक दर्शनी भागात 14  दिवसांकरीता लावणे बंधनकारक असेल, गृह अलगीकरणाचा शिक्का रुग्णांवर मारणे आवश्यक राहील, सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापकांनी /विश्वस्तांनी सदर धार्मिक स्थळांच्या ठिकाणच्या जागेची उपलब्धता विचारात घेऊन गर्दी होणार नाही व आवश्यक सामाजिक अंतर राखले जाईल. हे आदेश 31 मार्चपर्यंत लागू राहतील. या आदेशाची अंमलजावणी सर्व आस्थापनांमार्फत/नागरिकांमार्फत काटेकोरपणे केली जाईल, यादृष्टीने आवश्यक नियोजन जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी करावे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती  शिक्षेस पात्र राहील, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी निधी चौधरी यांनी सूचित केले आहे.