पनवेलमध्ये सात भरारी पथके

पालिका व पोलीस प्रशासन करणार संयुक्त कारवाई

पनवेल : शहर आणि तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची मोठी वाढ होत असून बुधवारी 248 करोना रुग्ण सापडले. त्यामुळे पालिका व पोलीस प्रशासन यांनी गुरुवारी संयुक्त बैठक घेत राज्यशासनाने लागू कलेल्या नियमांची शहरात काटेकारे अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. ही बैठक पालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि पोलीस परिमंडळ 2चे उपायुयक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. 

कोरोना नियमाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस विभाग आणि महानगरपालिकेचे कर्मचारी संयुक्तिकरीत्या कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सात पोलीस स्टेशन असून पोलिसांसोबत पालिकेची सात भरारी पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके नेमलेल्या विभागामध्ये नियम न पाळणार्‍यांवर दंडात्मक आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारची कारवाई करणार आहे. तसेच बाजारसमित्या, मुख्य बाजारपेठा या ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावरही चर्चा झाली. हॉटेल, रेस्टॉटंट, बार, आस्थापना याठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा जास्त गर्दी असेल तर अशांवरती गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच कोरानाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत या आस्थापना सील करण्यात येणार असल्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.  सील करण्यात आलेल्या कंटेन्टमेंट झोनमधील गृह निर्माण सोसायट्यांमधील पॉझिटिव्ह तसेच लक्षणे नसलेले रुग्ण बाहेर फिरताना दिसल्यास त्यांना इंडिया बुल्स येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये जबरदस्तीने हालविण्यात येईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या बैठकीस साहाय्यक आयुक्त नितीन भोसले पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खारघर येथील शत्रुघ्न माळी, तळोजा येथील काशीनाथ चव्हाण, कळंबोली येथील संजय पाटील, कामोठे येथील स्मिता जाधव, खांदेश्वर येथील देविदास सोनावणे, पनवेल शहर येथील अजयकुमार लांडगे, पनवेल तालुका येथील रवींद्र दौंडकर तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त संजय शिंदे, साहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, साहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर उपस्थित होते.

अशी कारवाई पनवेल तालुक्यातील आणि विविध शहरांतील प्रवेशद्वारांवर यापुढे नवी मुंबई पोलीस व पालिकेचे कर्मचारी असे पथक तैनात दिसणार आहेत.या पथकातील कर्मचारी हे मुखपट्टी न घालणार्‍या आणि सामाजिक अंतर न पाळणार्‍यांवर पुन्हा एकदा कारवाई करतील तळोजा, कळंबोली, खारघर, कामोठे, पनवेल शहर, खांदेश्वर व पनवेल तालुका अशा सर्व पोलिसांना यामध्ये सक्रिय करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पाटील यांनी दिले आहेत.प्रतिबंधक क्षेत्रात गृहनिर्माण सोसायट्यांमधील बाधित तसेच लक्षणे नसलेले रुग्ण बाहेर फिरताना दिसल्यास त्यांना उचलून कोन येथील इंडिया बुल्स येथील विलगीकरण कक्षात जबरदस्तीने हलविण्यात येईल.