अपघात झाल्याने फसला हत्येचा कट

गोळीबार करणारा अटकेत 

नवी मुंबई : गोळीबार प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नातेवाईकाची हत्या करण्यासाठी मित्राच्या दुचाकीवरुन निघालेल्या आरोपीचा रस्त्याच अपघात झाला. त्यामुळे दुचाकी देणार्‍या मित्रापुढील कायदेशीर अडचणी टळल्या आहेत शिवाय ज्याची हत्या करायची होती त्याचाही जीव वाचला आहे. 

मित्राच्या मोटरसायकलवरून तो मद्यधुंद अवस्थेत नातेवाइकाचा काटा काढण्याच्या उद्देशाने निघाला होता. त्यापूर्वीच किरकोळ अपघात झाल्याने रागाच्या भरात त्याने अपघाताच्या ठिकाणीच गोळीबार करून पळ काढला. अन्यथा ज्या व्यक्तीचा काटा त्याला काढायचा होता, त्याच्यावर गोळी झाडण्यात तो यशस्वी झाला असता. अशावेळी त्याने गुन्ह्यासाठी वापरलेल्या दुचाकीमुळे त्याचा मित्र कायद्याच्या कचाट्यात आला असता. गोळीबाराच्या घटनेनंतर वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले होते. त्यात निरीक्षक गजानन कदम, नीलेश येवले, नीलेश धुमाळ, राजरत्न खैरनार, हवालदार गणपत पवार, दिनेश पाटील, विकास निकम, राकेश पाटील, गणेश चौधरी, किरण बुधवंत, शंकर भांगरे, गणेश गिते आदींचा समावेश होता. त्यांनी करकेरा याने वापरलेल्या दुचाकीचा शोध घेण्यावरच भर दिला होता. यासाठी त्याने मार्गावरील सीसीटीव्ही तपासले. यादरम्यान त्याला देशी दारूची सवय असल्याची माहिती वाशीतील बारमधून पोलिसांना मिळाली. यावरून त्याला कोपरखैरणेतून अटक करण्यात आली. त्यापूर्वी दुचाकीचा सुगावा लागला असता तर त्या मित्रापुढील अडचणीत वाढ झाली असती. रागाच्या भरात गोळीबार केल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी रुपेश करकेरा (35)ला अटक केली. न्यायालयाने त्याला 21 मार्चपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. चौकशीत त्याने मित्राची मोटरसायकल तात्पुरती वापरण्यासाठी घेतली होती अशी कबुली दिली आहे.